पालकांनो आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातून एक चिमुकली तब्बल सात तास गायब झाली होती. भोसरी परिसरातील अवघ्या साडेचार वर्षांची आलिया आई-वडीलांपासून दूर होती. सर्वत्र तिचा शोध घेतला जात होता, परंतु तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. आई वडील घाबरले. आपली एकुलती एक मुलगी गेली कुठे हा त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न होता. आपल्या मुलीचे अपहरण तर झाले नाही ना असे अनेक प्रश्न वडील मोहम्मद हैदर खान यांना पडले होते. अखेर खान यांनी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांची मदत घेण्याचं ठरवलं आणि पोलिसांनी अवघ्या काही तासातच चिमुकलीला शोधून काढलं.

शहरात गेल्या काही दिवसांपासून अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालक हे नेहमी घाबरलेल्या अवस्थेत असतात. आलिया मोहम्मद खान वय साडेचार वर्ष ही शुक्रवार रोजी दुपारी तीनच्या सुमारास खेळता खेळता घराबाहेर निघून गेली. घरात आई होती,परंतु आलिया नेहमीच बाहेरील परिसरात खेळत असत त्यामुळे आईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. बराच वेळ झाला तरी आलिया घरात आलीच नाही. आईने बाहेर येऊन पाहिले असता आलिया दिसली नाही. तिचा शोध सुरू झाला. आलिया ही खान कुटुंबाची एकुलती एक मुलगी. अलियाचा शोध घेण्यासाठी ते वास्तव्यास असलेले भगतवस्ती परिसर पिंजून काढला मात्र आलिया काही सापडत नव्हती.

अखेर पोलिसांची मदत घ्यायची वडिलांनी ठरवले. त्यानुसार रात्री आठ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात येऊन साडेचार वर्षीय आलिया अचानक खेळता खेळता घराबाहेर गेल्याची माहिती दिली. भोसरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आणि ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाला शोधायला सुरूवात केली. आलिया घरातून कुठे गेली असेल याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येक सीसीटीव्ही भोसरी पोलिसांनी तपासला, एका सीसीटीव्हीमध्ये आलिया चालत जात असल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास त्या दिशेने जात दीड किलोमीटर अंतर कापलं आणि आलियाला शोधलं. हे यश भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांना मिळाले होते. आलिया घरापासून दीड किलोमीटर लांब गेली होती.

तब्बल सात तासानंतर आलिया पुन्हा आई वडिलांना भेटली होती. त्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आईला रडू कोसळले तर वडील देखील भावूक झाले होते. दोघांनी पोलिसांचे आभार मानले. आपल्या काळजाचा एकुलता एक तुकडा एवढे तास बाहेर असल्याने जीव रमत नव्हता. या घटनेमुळे पुन्हा एकदा पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवत नसल्याचे समोर आले आहे.