विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमाच्या जागा भरल्या ल्ल अद्यापही साडेचार हजार विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावीच्या तीन केंद्रीय प्रवेश फेऱ्यांनंतरही साधारण साडेचार हजार विद्यार्थ्यांना अद्यापही कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश मिळालेला नसून हे सर्व विद्यार्थी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमातील प्रवेशासाठी अर्ज केलेले आहेत. मात्र या दोन्ही शाखांच्या सर्व जागा भरल्यामुळे राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता कला शाखेला प्रवेश घ्यावा लागणार आहे.

अकरावीची तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. विज्ञान शाखा आणि वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमात आता रिक्त जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे तीन फेऱ्यांनंतरही ४ हजार ८४४ विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच आहेत. तर त्याचवेळी कला शाखा आणि वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमाच्या जवळपास ७ हजार जागा रिक्त आहेत. मात्र, विज्ञान शाखा किंवा वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमातच प्रवेश घेण्यासाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळू शकलेला नाही.

यावर्षी तिसऱ्या फेरीत एकूण १८ हजार ७६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यातील १० हजार ७०३ विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच महाविद्यालय मिळाले, तर ७ हजार ३७३ विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार वरचे महाविद्यालय (बेटरमेंट) मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयांत गुरुवारी (१४ जुलै) प्रवेश निश्चित करायचा आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी १८ जुलैला जाहीर होणार आहे.

तात्पुरता म्हणजे पन्नास रुपये भरून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी १५ ते २० जुलै या कालावधीत पूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे.

प्रवेशाची स्थिती

  • एकूण प्रवेश क्षमता – ७३ हजार ३८५
  • केंद्रीय प्रक्रियेची क्षमता – ५४ हजार ६२९
  • आलेले एकूण अर्ज – ८२ हजार १०६
  • पहिल्या फेरीत झालेले प्रवेश – ३६ हजार ६३३
  • दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश (नवे आणि बेटरमेंट) – ८ हजार ९८९
  • तिसऱ्या फेरीत नव्याने महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी – १० हजार ७०३
  • तिसऱ्या फेरीत बेटरमेंट मिळालेले विद्यार्थी – ७ हजार ३७३

Untitled-3