विमानाची तिकिटे आरक्षित करण्यास लावून दत्त दिगंबर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स प्रा. कंपनीची अठरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिया संदीप कुलकर्णी (वय ३८, रा. अतुलनगर, वारजे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांचा दत्त दिगंबर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीचा व्यवसाय आहे. त्याच्या परदेशी ग्राहकांसाठी ते नेहमीच विमानाची तिकिटे ऑनलाइन आरक्षित करतात. परदेशातील त्यांच्या ग्राहकांच्या नावाने ट्रॅव्हल्स कंपनीला आरोपींनी इमेल करून वेगवेगळ्या देशात जाण्यासाठी विमानाची २४ तिकिटे आरक्षित करण्यास सांगितले. त्यानुसार ट्रॅव्हल्स कंपनीने संबंधित ग्राहकाला तिकिटाचे बिल पाठविले. मात्र, त्या ग्राहकाकडून त्यांनी अशा कोणत्याच प्रकारची तिकिटे आरक्षित करण्यास सांगितले नसल्याचे सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी त्यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आयटी अॅक्ट अनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव विधाते हे अधिक तपास करीत आहेत.