देशभरासह राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. यामुळे आपली गावं सोडून मोठ मोठाल्या शहरांमध्ये रोजगारसाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांची अन्न, पाण्याबरोबरच निवाऱ्याची अडचण झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड भागातील अशा गरीब व गरजू नागरिकांना मराठवाडा जनविकास संघाकडून चटणी-भाकरीचे वाटप केले जात आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीसह लॉक डाऊनची घोषणा केल्यामुळे अनेक ठिकाणचे उद्योग, कंपन्या काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याने येथील कामगारांसह हातवर पोट असणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मदतीसाठी अनेक दानशूरांसह अन्नदाते देखील पुढे येताना दिसत आहेत. अनेक शहरांमध्ये विविध संस्था, राजकीय पक्षांबरोबरच संघटनांकडून गरिबांना अन्न वाटप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडा जनविकास संघाने यासाठी पुढाकार घेऊन गरीब आणि गरजू व्यक्तींना जेवण मिळावं म्हणून चटणी आणि भाकरी वाटपाचे कार्य हाती घेतले आहे.

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यासह देशभरातून कामगार आलेले आहेत. परंतु, अचानकच करोना रुपी संकट येवून धडकल्याने सर्व काही जागच्या जागीच थांबलं आहे. अनेकाच्या हातचा रोजगार देखील गेल्याने व आपल्या गावी परतणेही कठीण झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे.

ही परिस्थिती पाहून मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार  यांनी मागील तीन दिवसांपासून गरजूंना चटणी-भाकरी देण्याचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून फोनही येत असून ते नागरिकांना अन्न पुरवत आहेत.