गुडघ्याचा केवळ खराब भाग बदलण्याची ‘ऑक्सफर्ड नी रीप्लेसमेंट’ ही शस्त्रक्रिया गरजू रुग्णांना दरवर्षी १० लाख रुपयांपर्यंत मोफत करून देण्याची सुविधा ‘लक्ष्मी रघुनाथ मेडिकल फाऊंडेशन’ने उपलब्ध करून दिली आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. संजीव गोखले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘केसरी’चे माजी संपादक डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २७ सप्टेंबरपासून या उपक्रमास सुरुवात होणार आहे. ‘ऑक्सफर्ड नी रीप्लेसमेंट’ या शस्त्रक्रियेत गुडघ्याचा जेवढा भाग खराब झालेला असतो तेवढाच कप्पा बदलून उरलेला गुडघा वाचवला जातो. यात गुडघ्यातील दोन हाडांना जोडणारे लिगामेंट काढले जात नसून या शस्त्रक्रियेचा परिणाम १५ ते २० वर्षे टिकत असल्याचे डॉ. संजीव गोखले यांनी सांगितले.
ही शस्त्रक्रिया अद्याप मोठय़ा प्रमाणावर केली जात नसून त्याचा खर्च साधारणत: १ लाख ४० हजार इतका असतो. आपल्या उपक्रमात वर्षभरात ६ गरजू रुग्णांवर ही शस्त्रक्रिया गोखले रुग्णालयात पूर्णत: मोफत करण्यात येणार आहे. सध्या या शस्त्रक्रियेसाठी २ गरजू रुग्णांची नावेही समोर आल्याचे ते म्हणाले. दर गुरुवारी गरजूंसाठी सवलतीच्या दरात बाह्य़रुग्ण तपासणीची सोयही रुग्णालयात उपलब्ध आहे. मोफत शस्त्रक्रियांच्या उपक्रमासाठी संस्थेतर्फे मदत स्वीकारली जाणार असून त्याअंतर्गत देणगीदारांना करात एटीजी करसवलतही मिळेल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.