रुग्णांसह नातलगांना मोफत जेवणाचा डबा

नारायणगाव : करोना केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या आणि जेवणाची व्यवस्था नसलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी नारायणगावातील भटकंती ट्रेकर्स ग्रुपकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. करोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठी तरुणांकडून सकस जेवणाचा डबा मोफत पुरविण्यात येत आहे. २८ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात एक हजारांहून अधिक डबे पुरविण्यात आले आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सध्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंबच करोनाबाधित झाल्यास रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात जेवनाचीही मुख्य अडचण निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन नारायणगाव येथील भटकंती ट्रेकर्स ग्रुपचे सुदीप कसाबे, महेश वालझाडे, रवी वामन, सोहम वामन, तुषार दिवटे, अमित वालझाडे, प्रणव भुसारी, सुनील इचके, दर्शन वामन, अनिल दिवटे, प्रसाद दळवी आदी युवकांनी नारायणगाव परिसरामध्ये असलेल्या करोना उपचार रुग्णालयांत सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळचे जेवणाचे डबे विनामूल्य पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नारायणगांव ठाण्यातील ५० पोलीस कर्मचारी आणि इतर १११ असे एकूण १६१ जणांना डबे देण्यात आले. दररोज शंभरहून अधिक रुग्णांना डबे पुरविण्यात येत आहेत  याबाबत ग्रुपच्या युवकांनी सांगितले, की आपणही समाजाचे काही देणेकरी आहोत म्हणून सामाजिक भावनेतून भटकंती ट्रेकर्स ग्रुप हे सेवेचे कार्य करीत आहे. नारायणगाव परिसराबरोबरच शिरोली बुद्रुक, उंब्रज, वारूळवाडी अशा गावांमध्ये डबे पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे.