News Flash

‘नोव्हार्टिस’ ची मोफत औषध पुरवठा योजना सुरूच

‘नोव्हार्टिस’ या कंपनीतर्फे चालविण्यात येणारी रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात ग्लिवेक औषध पुरवण्याची योजना सुरूच राहणार आहे

| April 3, 2013 03:00 am

‘नोव्हार्टिस’ या औषधनिर्मात्या कंपनीला रक्ताच्या कर्करोगावरील ‘ग्लिवेक’ या औषधाचे पेंटट मिळविण्यात अपयश आले असले तरी कंपनीतर्फे चालविण्यात येणारी रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात ग्लिवेक औषध पुरवण्याची योजना सुरूच राहणार आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ट असलेल्या सोळा हजार कर्करुग्णांना दिलासा मिळाला आहे.
या योजनेत औषधाचे वितरण व रुग्णांचा पाठपुरावा करण्याचे काम ‘मॅक्स फाऊंडेशन’ ही संस्था करते. या संस्थेच्या देशातील प्रमुख विजी व्यंकटेश यांनी ‘लोकसत्ता’ ला ही माहिती दिली आहे.
नोव्हार्टिस कंपनीतर्फे देशात गेल्या अकरा वर्षांपासून ‘जीपॅप’ (ग्लिवेक इंटरनॅशनल पेशंट असिस्टन्स प्रोग्रॅम) ही योजना राबविली जाते. या योजनेत ज्या रुग्णांना तज्ज्ञांकडून ग्लिवेक हे औषध सुचविण्यात आले आहे त्यांना ते मोफत अथवा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले जाते. ‘ल्युकेमिया’ आणि ‘जिस्ट’ (गॅस्ट्रोइंटेस्टिनल स्ट्रॉमल टय़ूमर) या दोन प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण विशिष्ट अटींखाली या योजनेस पात्र ठरू शकतात. नोव्हार्टिसला ग्लिवेकचे पेटंट नाकारण्यात आले असले तरी या योजनेवर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचे व्यंकटेश यांनी स्पष्ट केले.
व्यंकटेश म्हणाल्या, ‘‘सध्या या औषध पुरवठा योजनेत देशातील सोळा हजारांहून अधिक कर्करुग्णांना ग्लिवेक पुरवले जाते. यातील चारशे रुग्णांना हे औषध अत्यल्प दरात दिले जाते. तर इतर रुग्णांना ते पूर्णपणे मोफत दिले जाते. गेली अकरा वर्षे ही योजना सुरू असून नोव्हार्टिसला ग्लिवेकचे पेटंट नाकारले असले तरीही ती सुरूच राहणार आहे. याबाबत नोव्हार्टिसचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत शहानी यांच्याशी मॅक्स फाऊंडेशनची चर्चा झाली आहे. सध्या औषध पुरवठा करण्यात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी जितके दिवस ग्लिवेक घेण्यास सुचविले असेल तितके दिवस त्यांना ते पुरविले जाईल. त्यात खंड पडणार नाही. तसेच नवीन रुग्णांनाही या योजनेत समाविष्ट करणे सुरू राहणार आहे.’’
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:00 am

Web Title: free medicine programme will continue from novartis
Next Stories
1 मूळच्या पुण्याच्या पूजा रानडेचा बुद्धय़ंक आइनस्टाइनपेक्षाही जास्त
2 नेट-सेटमधून प्राध्यापकांना सूट, पण या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे काय?
3 व्यापारी संघटनांचा महामोर्चा;
Just Now!
X