जेजुरी,वार्ताहर
करोना प्रादुर्भावामुळे श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर चार महिन्यापासून बंद असल्याने येथील अर्थव्यवस्था कोलमडली आहे .हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांना नियमित घ्यावी लागणारी औषधे घेणे मुश्किल झाले. त्यामुळे या रुग्णांना मोफत औषधे दिली जात आहेत.अशा १०७ गरजू रुग्णांना चौथ्या महिन्याचे औषधांचे वितरण करण्यात आले. जेजुरीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते दवाखान्यातच औषधे देण्यात आली .

यावेळी डॉ.नितीन केंजळे,प्रकाश खाडे उपस्थित होते तर अनेकांना औषधे घरपोच करण्यात आली.यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब,पक्षाघात आदी औषधांचा समावेश आहे.येथील डॉक्टर नितीन केंजळे ,डॉ शमा केंजळे,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खाडे ,डॉ प्रसाद खंडागळे,पुष्कर खाडे यांनी लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सेवा संघाची स्थापना केली असून आतापर्यंत चार महिन्यात दोन लाख रुपयांची औषधे गरीब गरजू रुग्णांना मोफत देण्यात आली आहेत. यामध्ये वाघ्या-मुरळी ,वृद्ध कलावंत,पथारीवाले यांचा समावेश आहे .अनेक दानशूर औषधासाठी मदत करीत आहेत .खंडोबा मंदिर सुरू होईपर्यंत ही योजना सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. केंजळे यांनी सांगितले.