पुणे : शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत रुग्णवाहिकांची अपुरी संख्या लक्षात घेता आरोग्य सेवा आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने ‘२४ तास मोफत रिक्षा रुग्णवाहिका’ हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे. करोना रुग्णांसाठी १५ मेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली. संबंधित सेवेची आवश्यकता असणाऱ्यांनी ९८५०४९४१८९ किंवा ७८४१०००५९८ या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १ मेपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘आरोग्य सेना मिशन कोविड महासाथ २०-२१’ अंतर्गत गेले वर्षभर देशातील पाच राज्यांमध्ये मदतकार्य करण्यात आले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून १ मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या निमित्ताने पुणे शहरातील करोना रुग्णांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या सोबतीने एकशे दोन रिक्षा रुग्णवाहिकांची २४ तास मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य सेनेचे संस्थापक, राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांच्यासोबत महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पुणे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, सल्लागार कुमारे शेटे, मुराद काझी आदी उपस्थित होते. उपक्रमात सहभागी रिक्षांमध्ये आणखी १०० रिक्षांची भर घालण्याचा मानस दोन्ही संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे.