पिंपरी : करोनाबाधित रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांना गरजेच्या वेळीच वाहन मिळत नसल्याचे पाहून निगडीतील एका रिक्षाचालकाने त्याच्याकडील पाच रिक्षा अशा कामांसाठी विनामूल्य दिल्या आहेत.

राहुल शिंदे, असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. निगडीत राहणाऱ्या या तरुणाने काही वर्षांपूर्वी रिक्षाव्यवसाय सुरू केला. हळूहळू प्रगती करत एकाच्या पाच रिक्षा केल्या. करोनामुळे रिक्षाव्यवसायही थंडावला. करोना संकट काळात उपलब्ध रिक्षाचा उपयोग गरजूंसाठी करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. शुभम दुबळे, रवींद्र जाधव, मनोज सुतार, सुधीर कांबळे या मित्रांनी भक्कम साथ दिली.

करोनाबाधित रुग्णांना कोणी वाहन देत नाही. त्यांच्या नातेवाइकांना वाहने उपलब्ध होत नाहीत. वेळीच रुग्णवाहिका मिळत नाहीत. अशावेळी हे तरुण मदतीसाठी धावून जात आहेत. एखाद्या रुग्णासाठी दूरध्वनी आल्यास उपलब्ध असणारा तरुण रिक्षा घेऊन जातो. रुग्णाला रुग्णालयात सोडले जाते. ही सेवा अगदी विनामूल्य केली जाते. या तरुणांच्या मदतकार्याची माहिती परिसरात सर्वांना झाली असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने करोना रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. ताण असल्याने वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून पाच रिक्षांच्या माध्यमातून ही विनामूल्य सेवा देत आहे. याकामी मित्रांची साथ मिळाली आहे. कोविडच्या लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. रिक्षाचालक म्हणून खारीचा वाटा उचलला आहे. – राहुल शिंदे, रिक्षामालक-चालक