पुण्यात स्वाईन फ्लूची साथ पसरल्यानंतर घबराटीपोटी स्वाईन फ्लूची चाचणी करून घ्यायला हवी अशी भूमिका नागरिकांमध्ये दिसत असली तरी स्वाईन फ्लूसारखी लक्षणे दिसणाऱ्या सरसकट सर्वच रुग्णांना स्वाईन फ्लूची चाचणी करून घेण्याची आवश्यकता नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत स्वाईन फ्लूची चाचणी मोफत होते. पण खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांमध्ये या चाचण्यांसाठी दर चार ते पाच हजार रुपये आकारले जात असून चाचण्यांचा खर्च २५०० रुपयांपर्यंत कमी करावा असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी मुंबईत केले. दुसऱ्या बाजूला स्वाईन फ्लूसारखी लक्षणे असणाऱ्या सर्वच रुग्णांना त्यासाठी चाचणी करणे गरजेचे नसून चाचणीपेक्षा स्वाईन फ्लूचा प्रतिबंध आणि लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाने स्वत:ची काळजी घेण्यालाच प्राधान्य दिले जावे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.  
ससून रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम म्हणाले, ‘‘स्वाईन फ्लूसाठीची चार तासात अचूक निष्कर्ष देणारी चाचणी म्हणजे ‘रिअल टाईम पीसीआर’ ही आहे. पुण्यात ही चाचणी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेसह निवडक प्रयोगशाळांमध्ये होते. पण सर्वच बाह्य़रुग्णांची स्वाईन फ्लू चाचणी करण्यात अर्थ नाही. ज्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, रुग्णाला न्यूमोनियासारख्या इतर गुंतागुंती आहेत त्यांच्याच चाचण्या करायच्या आणि इतरांना केवळ गोळ्या द्यायच्या ही पद्धत योग्य आहे.’’
स्वाईन फ्लूमध्ये प्रयोगशाळेत चाचणी करून घेण्यास अधिक प्राधान्य देण्याची गरज नाही, असे मत डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘बहुतेक वेळा डॉक्टरांनी रुग्णाला तपासून, त्याची लक्षणे पाहूनच इन्फ्लुएन्झाचे निदान होऊ शकते. स्वाईन फ्लूला औषध देण्याचीही फार वेळा गरज पडत नाही. पण लहान मुले, वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक, गरोदर स्त्रिया अशा विशिष्ट गटातील रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू गुंतागुंतीचा ठरू शकतो. त्यामुळे रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेणे, भरपूर पातळ पदार्थ घेणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे आणि रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असल्यास त्याला ‘ऑसेलटॅमीविर’ हे औषध देणे हे उपाय पुरेसे ठरतात. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर असतानाच ते डॉक्टरांकडे आलेले असतात त्यांची चाचणी करण्याआधी त्यांच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे असते. त्यामुळे स्वाईन फ्लूवरचा खरा उपाय आजाराचा प्रतिबंध आणि आजार झाल्यावर लवकरात लवकर काळजी घेणे हे आहेत. प्रयोगशाळेतील तपासण्यांवर अधिक पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही.’’
जन आरोग्य अभियान या संघटनेचे डॉ. अनंत फडके म्हणाले, ‘‘रुग्णाला पहिल्या दोन-तीन दिवसांचा सामान्य सर्दी-ताप असल्यास त्याला चाचणी करायची गरज नाही असे शासनाचेच निर्देश आहेत. स्वाईन फ्लूच्या ९० टक्के रुग्णांना काही धोका नसतो. गुंतागुंत होऊ शकणारे १० टक्के रुग्ण कोणते हे आधी कळू शकत नाही. तीव्र ताप, ३ दिवसांपेक्षा जास्त राहिलेला ताप, तापाबरोबर उलटय़ा-जुलाब अशी वेगळी लक्षणे दिसत असल्यास किंवा रुग्णाला शंका आल्यास सरकारी दवाखान्यात गेलेले चांगले. तेथील डॉक्टरांना स्वाईन फ्लूचे रुग्ण पाहून आजाराचा चांगल्या प्रकारे अंदाज आलेला असतो.’’