तूट दोन्ही महापालिका देणार; पीएमपी संचालक मंडळाचा निर्णय, १४ मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय

‘तेजस्विनी’ या महिलांसाठीच्या बसमधून प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तेजस्विनी गाडय़ांच्या १४ मार्गावर ही सुविधा राहणार असून त्यामुळे पीएमपीला येणारी त्या दिवसाची तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून देण्यात येणार आहे.

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, संचालक, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांच्यासह पीएमपीचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

शहरातील दुचाकी आणि चारचाकी तसेच अन्य वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. त्यातून बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेला चालना देण्यासाठी महापालिकेने १५ ऑक्टोबर २०१६ मध्ये महिन्यातून एक दिवस पीएमपीचा प्रवास विनामूल्य उपलब्ध      करून देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या आधारे तेजस्विनी या महिलांसाठीच्या विशेष गाडय़ातून महिन्यातून एकदा विनामूल्य प्रवास उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला होता. त्याला बुधवारी एकमताने मान्यता देण्यात आली.

दर महिन्याच्या ८ तारखेला महिला प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारपासून (८ मार्च) या सेवेला प्रारंभ होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. कात्रज ते शिवाजीनगर, अप्पर डेपो ते शिवाजीनगर, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसर ते वारजे-माळवाडी, कोथरूड ते कात्रज, भेकराईनगर ते महापालिका भवन, स्वारगेट ते धायरी, मनपा भवन ते लोहगांव, मनपा ते वडगांवशेरी, मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, मनपा ते आळंदी, मनपा ते आकुर्डी रेल्वे स्थानक, निगडी ते हिंजवडी-माण फेज-३ या चौदा मार्गावर सध्या तेजस्विनीची सेवा देण्यात येत आहे.

लवकरच ३० तेजस्विनी गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात

मार्च २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीमध्ये तेजस्विनीमधून प्रतिमहिना २.३३ लाख आणि वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला. तेजस्विनी महिला बसचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न सरासरी ३४ लाख ३७ हजार ६८२ रुपये असे असून वार्षिक उत्पन्न ४ कोटी १२ लाख ५२ हजार १८४ रुपये आहे. तेजस्विनी महिला गाडय़ांमध्ये महिला वाहकांची नेमणूक करण्यात आली असून सप्टेंबर २०१८ पासून दामिनी तिकिट तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीच्या मार्गावरील महिला प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेऊन येत्या काही दिवसांमध्ये नव्याने २५ ते ३० तेजस्विनी गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. राज्य शासनाने त्यासाठी वित्तीय साहाय्य केले आहे.