भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लखलखते पान असलेल्या १९४२ च्या आंदोलनात पुण्यातील कॅपिटल चित्रपटगृहात क्रांतिकारकांनी केलेल्या बॉम्बस्फोटातील सेनानी, मसाजतज्ज्ञ आणि नामवंत वकील हरिभाई लिमये (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

कॅपिटल बॉम्बस्फोटाच्या घटनेत पोरवयात सहभागी होऊन ब्रिटिशांचा छळ आणि चार वर्षांचा तुरुंगवास सहन करणारे क्रांतिकारक, स्वातंत्र्यानंतरच्या काळात लिमये महाराज मसाज केंद्राद्वारे हजारो रुग्णांची तुटलेली हाडे मोफत सांधणारे मसाजतज्ज्ञ आणि नामवंत वकील हरिभाऊ लिमये यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने या सुवर्णपर्वाचा अखेरचा दुवा आज निखळला असून तन, मन, धनाने चळवळीला देता हात हरपला. कोणतेही धार्मिक विधी न करता लिमये यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

हरिभाऊ यांचा जन्म २६ एप्रिल १९२६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे आजोबा लक्ष्मण लिमये यांनी दीडशे वर्षांपूर्वी भारतीय उपचार पद्धतीमधील मसाज केंद्र घरीच मोफत सुरू केले. त्यांच्यानंतर हा वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र वामन ऊर्फ महाराज लिमये यांनी सुरू ठेवला. महाराज लिमये यांचे हरिभाऊ धाकटे चिरंजीव. श्रीकृष्ण लिमये आणि माजी महापौर निळूभाऊ लिमये हे हरिभाऊंचे ज्येष्ठ बंधू होत. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीने हरिभाऊंना झपाटून टाकले होते. इंग्रज सरकारच्या अत्याचार आणि दडपशाहीला पुण्यात निरपराध नागरिक आणि स्त्रिया बळी पडल्या होत्या. अवघ्या १६ वर्षांच्या हरिभाऊंच्या मनात या बद्दल संतापाची आग धगधगत होती. त्यांच्याहून वयाने थोडय़ा मोठय़ा तरुणांनी छावणी परिसरातील कॅपिटल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट करण्याचे ठरवले. त्यांना हरिभाऊंनी साथ दिली. ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी तेथे मोठय़ा संख्येने सिनेमा बघायला येत असत. त्या वेळी पोलीस समोर येताच त्यांनी बॉम्बच्या रसायनाची बाटली खिशात घातली होती. ती खिशातच सांडली आणि मांडी भाजून निघाली तरी सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी तोंडातून अवाक्षरही काढले नाही. नंतर पोलिसी हिसका दाखवूनही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली.

तुरुंगातून सुटका झाल्यावर आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी एल.एल.बी. पदवी संपादन केली. वकिलीबरोबरच वडिलांचे मसाज उपचाराचे सेवाव्रतही त्यांनी जीवनाच्या अखेपर्यंत सुरू ठेवले. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. तर, आणीबाणीत तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली. चळवळी आणि कार्यकर्त्यांचे ते आधारवड होते. त्यांनी आपली बुद्धी, धन, जागा यांची मुक्तहस्ते मदत केली. वंचितांसाठी कार्यरत संस्थांना ते ठरावीक तारखेला न चुकता देणगीचा धनादेश पाठवत. अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजींचे कर्तृत्व मांडणारे अमृतपुत्र साने गुरुजी, दारूबंदीची नशा, कारागृहातील पथिक यांसह ‘द हिलिंग टच’ अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.