शहराच्या पूर्व भागात वास्तव्य असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भालचंद्र वायाळ यांच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी लेकीची खटपट सुरू आहे. गेली २० वर्षे असलेला त्यांच्या नावाचा स्मृतिफलक पुन्हा योग्य जागी लावण्याची कार्यवाही करावी, असा आदेश तत्कालीन महापौरांनीही दिला होता. मात्र, लालफितीच्या कारभारामध्ये हा निर्णय अडकल्यामुळे अद्यापही कार्यवाही होऊ शकलेली नाही. वायाळ यांच्या जन्मशताब्दी वर्षांत तरी हा फलक सन्मानाने लावला जावा, अशी वायाळ यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे.
पुणे महापालिकेतर्फे गंज पेठ येथे स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक साकारण्यात आले आहे. त्यापूर्वी तेथे नागरवस्ती विकास विभागाचे कार्यालय होते. या कार्यालयाच्या आवारामध्ये बालभवन होते. भालचंद्र वायाळ यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी ‘स्वातंत्र्यसैनिक भा. ना. वायाळ बालभवन’ असा फलक लावण्यात आला होता. हा फलक २० वर्षांहून अधिक काळ वायाळ यांची स्मृती जागी ठेवत होता. नागरवस्ती विकास विभागाचे कार्यालय आणि बालभवनच्या जागेवर सावित्रीबाई फुले स्मारक साकारण्यात आले ही आनंदाची बाब आहे. मात्र, त्याजागी असलेला ‘भा. ना. वायाळ’ यांच्या नावाचा स्मृतिफलक अडगळीत ठेवण्यात आला आहे. तो योग्य ठिकाणी लावून वायाळ यांची स्मृती जतन करावी, अशी मागणी वायाळ यांची कन्या अलका भोसले यांनी केली आहे.
स्वातंत्र्यसैनिक भा. ना. वायाळ यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांचा गौरव म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या नावाचा फलक लावावा, अशी मागणी अलका भोसले यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसचिव कार्यालय आणि नागरवस्ती विकास योजनेचे प्रकल्प संचालक यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन हा नामफलक लावण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी अधीक्षक अभियंता यांना दिले होते. मात्र, यामध्ये फारसे काही घडलेले नाही. आता किमान जन्मशताब्दी वर्षांत तरी वायाळ यांच्या स्मृती जतन करणारा हा फलक योग्य ठिकाणी लावला जावा, अशी मागणी अलका भोसले यांनी केली आहे. त्या नागरी संरक्षण दलामध्ये मानसेवी विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

स्वातंत्र्यसेनानी-क्रांतिकारक वायाळ
साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक अशी भालचंद्र वायाळ यांची ओळख होती. साने गुरुजी यांच्याबरोबर गावोगावी जाऊन खडय़ा आवाजात पोवाडे गात ते सभा-मेळावे गाजवून स्वातंत्र्यासाठी जनजागृती करायचे. देश स्वतंत्र झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. १९४२ च्या कॅपिटॉल बॉम्बस्फोटामध्ये पडकल्यानंतर वायाळ यांना माफीचे साक्षीदार करण्यात आले होते. न्यायालयात साक्षीला जाण्यापूर्वी कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ते आईचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी आले होते. ‘तू फासावर गेलास तरी चालेल, पण त्या पाच जणांना वाचव,’ असे आईने त्यांना सांगितले. त्यानंतर वायाळ यांनी दिलेल्या साक्षीमुळे पोलिसांनी आरोपी ठरविलेल्या सर्वाची सुटका झाली. माफीचा साक्षीदार उलटला म्हणून पोलिसांनी त्यांना चाबकाने फोडून काढले होते. त्याचे व्रण अखेपर्यंत वायाळ यांच्या शरीरावर होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साने गुरुजी यांनीच १९४७ मध्ये त्यांचे लग्न लावून दिले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी वायाळ यांचा स्नेह होता. त्यांच्याबरोबर वायाळ यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. या मैत्रीखातर केंद्रीय गृहमंत्री असताना यशवंतराव हे वायाळ यांच्या मोठय़ा मुलीच्या लग्नाला हजर होते.