फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अपेक्षा

आणीबाणीच्या काळात मी पुण्याला होतो. हुकूमशहाचा उगम होतो तेथे भीतीपोटी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घातली जातात. हे केव्हा थांबणार आहे? विचारांचा कोणीही नाश करू शकत नाही. गुद्दय़ाने नको; मुद्दय़ाने उत्तर द्या, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी गुरुवारी व्यक्त केली. तलवारी आणि सुऱ्यांच्या साथीने लढणाऱ्यांविरुद्धच्या लढाईत मी एकटा गेलो होतो. मला माझी नाही तर युवा पिढीची चिंता वाटते, असेही दिब्रिटो म्हणाले.

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी दिब्रिटो बोलत होते. परिषदेचे कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या. दिब्रिटो यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी आलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये सत्कार कार्यक्रम झाला.

दिब्रिटो म्हणाले, मी अस्सल भारतीय आणि महाराष्ट्रीय आहे. माझी पुस्तक वाचा. मग मला विरोध करा. ‘बंगला-गाडी देतो’ असे सांगून मला परदेशातून बोलावणं आलं होतं. पण ‘गडय़ा, आपला गाव बरा’ असेच मी सांगितले. पुनर्जन्म मिळालाच तर मराठी घरात हवा आहे. माझे आणि मराठीचे नाळेचे नाते आहे. जगाला मार्ग दाखविणारा हिंदूधर्म कधी नष्ट होणार नाही. आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. एकमेकांचा द्वेष करणाऱ्या देशाला भवितव्य नसते. आपल्याला एकसुरी समाज निर्माण करायचा नाही. एक देश, एक धर्म आणि भाषा अराजक निर्माण करेल.

कसबे म्हणाले, भारत कधीही असहिष्णू नव्हता आणि होणारही नाही. वर्तमानाचे यथार्थ दर्शन घडते, तोच लेखक भूमिका घेऊ  शकतो. ते काम दिब्रिटो यांनी लेखनातून केले आहे.

चिंता आर्थिक विषयांची

मला चिंता हल्लय़ाची नाही तर आर्थिक विषयाची आहे. किती कारखाने बंद होत आहेत. कामगारांना कामावरून काढून चूल बंद केली जात आहे. त्याने मी अस्वस्थ आहे, अशी टिपणी फादर दिब्रिटो यांनी केली. नवा भारत निर्माण करण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमली पाहिजे. आपल्यातील गैरसमज दूर करण्यासाठी संवाद हीच सर्व समस्यांची किल्ली आहे, असेही त्यांनी सांगितले.