महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका कल्पना दिलीप बहिरट यांच्यावर निवडणुकीमध्ये बनावट जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेतील सहायक आयुक्त व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप शंकर ढोले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहिरट यांनी ओबीसींसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ४० (अ) या जागेमधून निवडणूक लढविली होती. निवडणुकीस पात्र होण्यासाठी त्यांनी पालिकेच्या ढोले पाटील रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशपत्र व प्रतिज्ञापत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र दाखल केले होते. त्यांनी सादर केलेले ओबीसीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे माहीत असूनही ते त्यांनी जाणीवपूर्व सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.