क्राइम पेट्रोल मालिका पाहून चोरीचा बनाव रचणाऱ्या दोघांना १२ तासाच्या आत गुन्हे शाखा ५ ने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३४ लाख ३९ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंगावर असलेले कर्ज फेडण्यासाठी तसंच मौजमजा करण्यासाठी आरोपींनी चोरी केल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. कुणाल रवींद्र पवार (२०) आणि ओंकार बाळासाहेब भोगाडे (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देहूरोड परिसरात आरोपी कुणाल आणि ओंकार यांनी चोरीचा बनाव रचला. कुणाल हा लॉजीकॅश या कंपनीत कामाला असून तो पैसे जमा करण्याचे काम करत असे. १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दिवसभर भोसरी, दिघी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपरी, देहूगाव आणि देहूरोड येथील काही व्यक्तींकडून पैसे जमा केले होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी चोरीचा कट रचला होता.

बुधवारी सहा वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कुणाल चालवत असलेल्या गाडीला धक्का दिला आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जवळील ३३ लाख ३० हजार रोख रक्कम पळवून नेली असे पोलिसांना भासवले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात विसंगती असल्याचं आढललं. तसंच मोबाइलमधील मेसेज डिलीट करण्यात आले होते. यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अखेर मित्रासह त्याने लुटण्याचा बनाव रचल्याचे समोर आले. सदरची कामगिरी सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे यांच्या पथकाने केली, तसेच देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी याप्रकरणी मदत केली.