आपले काम किंवा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने आपली ओळख इतरांना करुन देण्यासाठी व्हिजिटिंग कार्डचा वापर केला जातो. याच पद्धतीचा वापर घरकामं करणाऱ्या पुण्यात राहणाऱ्या एका मावशींनी केला आहे. त्यांनीही आपले एक व्हिजिटिंग कार्ड बनवले असून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या व्हायरल व्हिजिटिंग कार्डमुळे या मावशी रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि त्यांची हातची जाणारी दोन कामंही त्यामुळे वाचली.

पुण्यातील पाषाण भागातील सोसायटीमध्ये घरकाम करणार्‍या गीता काळे यांनी कामाचे स्वरुप आणि त्या प्रत्येक कामासाठी आकारण्यात येणारे दर याची माहिती देणारे व्हिजिटिंग कार्ड तयार केले आहे. या कार्डबाबत मागील दोन दिवसांपासून पुण्यात सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

या व्हिजिटिंग कार्डबाबत गीता काळे यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्या म्हणाल्या, “गेल्या पाच वर्षांपासून पाषाण आणि बावधन भागातील सोसायटी भागात पाच घरांचे काम करते, त्यातून संसार चालतो. काही घराचे काम जाणार म्हणून आठवड्याभरापासून मी अस्वस्थ होते. दरम्यान, धनश्री शिंदे यांच्या घरी काम करताना त्यांना मी माझी अडचण सांगितली. त्यानंतर धनश्री मॅडम यांनी माझ्यासाठी एक व्हिजिटिंग कार्ड तयार केले. त्यांनीच व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर ते कार्ड व्हायरल झाले, मी कोणालाही कार्ड दिले नसताना केवळ सोशल मिडियामुळे मला अनेकांचे कामासाठी फोन आले. यामुळे माझी जाणारी कामंही मला पुन्हा मिळाली.

धनश्री शिंदेंनी याबाबत सांगितले की, गीता काळे माझ्याकडे दोन वर्षांपासून काम करतात. काही दिवसांपासून, त्या तणावाखाली होत्या. तणावाचे कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, माझे दोन घरांचे काम जाणार असून घर सांभाळणे अवघड होणार आहे. यावर काही वेळ विचार करून मी ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड तयार केले आणि गीता काळे यांना देत सोसायटी परिसरात भेटणाऱ्या व्यक्तींना देण्यास सांगितले. तसेच माझ्या काही मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केले.