05 April 2020

News Flash

हंगामात ४ हजार ८८६ कोटींच्या ‘एफआरपी’चे वाटप

चालू हंगामात आतापर्यंत एकाही साखर कारखान्याला महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटीस देण्यात आलेली नाही.

६१ कारखान्यांकडून १०० टक्के रक्कम अदा

पुणे : यंदाच्या हंगामात आतापर्यंत १३८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यांपैकी ६१ कारखान्यांनी उसाची १०० टक्के रास्त व किफायतशीर रक्कम (एफआरपी) शेतकऱ्यांना दिली असून आतापर्यंत चार हजार ८८६ कोटी ७० लाख रुपयांच्या एफआरपीचे वाटप झाले आहे.

राज्यात गळीत हंगामाला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. गाळप सुरू असलेल्या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पाच हजार ८०८ कोटी नऊ लाख रुपयांची एफआरपी देणे आहे. त्यापैकी चार हजार ८८६ कोटी ७० लाख रुपयांची एफआरपी देण्यात आली, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली. गळीत हंगाम सुरु झालेल्या १३८ कारखान्यांपैकी ६१ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. ७७ कारखान्यांकडे एफआरपी थकीत आहे. ८० ते ९९ टक्के एफआरपी दिलेले १७ कारखाने आहेत. ६० ते ७९ टक्के एफआरपी २३ कारखान्यांनी दिली आहे. शून्य ते ५९ टक्के एफआरपी दिलेले ३७ कारखाने आहेत.

चालू हंगामात आतापर्यंत एकाही साखर कारखान्याला महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटीस देण्यात आलेली नाही. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी न देणाऱ्या ९३ कारखान्यांना आरआरसी नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित कारखान्यांनी एफआरपी दिल्याने थकीत एफआरपीचे प्रमाण कमी झाले आहे. अद्यापही दोन कारखान्यांकडे ३८४ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. संबंधित कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाचा परवाना देण्यात आलेला नसून  त्यांच्याविरुद्ध मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

गाळपात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर

हंगामात १४३ कारखान्यांनी गाळप परवाने घेतले आहेत. या कारखान्यांमधून झालेले ऊस गाळप आणि साखरेचे उत्पादन यांचा आढावा साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये साखर गाळपात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून पुणे जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. नागपूर जिल्ह्य़ात सर्वात कमी गाळप झाले आहे. १३८ कारखान्यांमधून २५४.२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर विभागात ३४ कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. त्याद्वारे आतापर्यंत ९८.७४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून या विभागातील ३० कारखान्यांमध्ये ६६.१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६९.९५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र घटले

राज्यात अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला सुरुवात झाली. गाळप परवाने घेतलेल्या १४३ कारखान्यांपैकी ७७ सहकारी आणि ६६ खासगी कारखाने आहेत. यंदा अतिवृष्टीचा ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ११ लाख ६५ हजार हेक्टर होते. यंदा साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र घटले असून सध्या उसाचे क्षेत्रफळ आठ लाख २२ हजार हेक्टर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 12:04 am

Web Title: frp allocation sugar factories kolhapur district akp 94
Next Stories
1 चंद्रकांत पाटील म्हणतात, निवडणुकीत दगाफटका झाला नसता तर…
2 “मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक तर महापाप करणारा महापौर होतो”
3 VIDEO : इंदुरीकर महाराजांची मिरवणूक काढत दर्शवला पाठिंबा
Just Now!
X