घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याने सर्व भाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्य़ांनी वाढ झाली. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून दीडशे ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक स्थिर आहे.

हिमाचल प्रदेशातून तीन ट्रक मटार, गुजरात, कर्नाटक येथून सहा ते सात ट्रक कोबी, गुजरातहून सात ते आठ ट्रक हिरवी मिरची, इंदूरहून चार ते पाच टेम्पो गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरातहून साडेपाच हजार गोणी लसूण, आंध्रप्रदेश, तामिळनाडूतून शेवगा चार टेम्पो, आग्रा, इंदुर, गुजरात आणि तळेगाव येथून ऐंशी ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून चौदाशे ते पंधराशे गोणी सातारी आले, टोमॅटो पाच ते सहा हजार पेटी, कोबी पाच ते सहा ट्रक, फ्लॉवर दहा ते बारा ट्रक, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, गावरान कैरी पाच ते सहा टेम्पो, चिंच पंचवीस ते तीस गोणी, भुईमूग शेंग तीनशे गोणी, कांदा सव्वाशे ट्रक अशी आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

रमजानमुळे फळांना मागणी, लिंबे स्वस्त

मुस्लीम धर्मीयांकडून रमजान महिन्यात उपवास (रोजे) केले जातात. रमजानमुळे फळांना मागणी कायम आहे. फळबाजारात लिंबांची आवक वाढल्याने लिंबांच्या दरात घट झाली आहे. पालखी सोहळ्यामुळे फळांना चांगली मागणी आहे. फळबाजारात रविवारी केरळहून सहा ट्रक अननस, मोसंबी तीस टन, संत्रा चार टन, डाळिंब चाळीस टन, पपई वीस ते पंचवीस टेम्पो, चिक्कू पाचशे गोणी, पेरू दोनशे पाटी, कलिंगड पंधरा ते वीस टेम्पो, खरबूज आठ ते दहा टेम्पो, गावरान आंबा पाचशे डाग अशी आवक फळबाजारात झाली.

पालेभाज्या कडाडल्या

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची वीस ते चाळीस रुपये दराने विक्री करण्यात आली. कोथिंबीर आणि मेथीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीच्या सत्तर हजार जुडींची आवक झाली.मेथीच्या पंधरा हजार जुडींची आवक झाली.