फळभाज्यांचे दर स्थिर; कोबी, मिरची, मटार महाग

पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. भेंडी, गवार, कारली, ढोबळी मिरची, पावटय़ाच्या दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबीर, मेथीची आवक वाढल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात घट झाली. कोबी, हिरवी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (४ जुलै) राज्य तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. घाऊक बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ५ ते ६ टेम्पो शेवगा, इंदूरहून ५ ते ६ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ८ ते १०  ट्रक लसूण, गुजरात आणि कर्नाटकातून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, मध्य प्रदेशातून ४ ते ५ टेम्पो गाजर, कर्नाटकातून  ४ ते ५ टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेशातून २ ते ३ टेम्पो पावटा, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, हिमाचल प्रदेशातून ३ टेम्पो मटार, आग्रा, इंदूर, गुजरात  तसेच स्थानिक भागातून मिळून ३० ते ३५  ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती बाजारातील प्रमुख व्यापारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

चिक्कू, कलिंगड, पपईच्या दरात वाढ

घाऊक फळबाजारात चिक्कू, कलिंगड, पपईच्या दरात वाढ झाली. मागणी वाढल्याने खरबूज, लिंबे, अननस, संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू आणि सीताफळाचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात केरळहून ४ ट्रक अननस, मोसंबी १० ते १२ टन, संत्री १ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू २५० ते ३००  क्रेट्स (प्लस्टिक जाळी), चिकू १०० खोकी, खरबूज १ ते २ टेम्पो, सीताफळ ६ ते ८ टन अशी आवक झाली.