बाजार समित्यांच्या नियमनातून फळे आणि भाजीपाला मुक्त करण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी गुलटेकडी मार्केटयार्डमधील फळे व भाजीपाला यांचा घाऊक बाजार सोमवारी पूर्णत: बंद ठेवण्यात आला. संघटनेने पुकारलेल्या लाक्षणिक बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजारात सोमवारी खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार झाले नाहीत.
फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या शासन निर्णयाला बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांनी विरोध केला असून या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेने सोमवारी बंद पुकारला होता. या बंदला पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाला. आडते, हमाल, तोलणार आदी बाजाराशी संबंधित सर्व घटकांच्या संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे गुलटेकडी येथील घाऊक बाजारात सोमवारी कोणतेही व्यवहार झाले नाहीत.