News Flash

मध्य पुण्यात बांधकामासाठी अडीच एफएसआय मिळणार

गावठाण भागातील चटईक्षेत्र निर्देशांकाचा (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) प्रश्न मार्गी लागला असून एफएसआय देण्याबाबत झालेली छपाईतील चूक अखेर दुरुस्त झाली आहे.

| February 14, 2015 03:30 am

पुणे शहराच्या जुन्या हद्दीत आणि विशेषत: गावठाण भागातील चटईक्षेत्र निर्देशांकाचा (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) प्रश्न मार्गी लागला असून एफएसआय देण्याबाबत झालेली छपाईतील चूक अखेर दुरुस्त झाली आहे. त्यामुळे जुन्या हद्दीतील बांधकामांना आता दोन ऐवजी अडीच एफएसआय मिळेल. गेली दीड वर्ष एफएसआयचा वाद शहरात सुरू होता.
शहराच्या जुन्या हद्दीतील बांधकामांसाठी पूर्वी दीड एफएसआय दिला जात असे. तसेच पुनर्विकासात भाडेकरू असलेल्या वाडय़ांना आणि अन्य मिळकतींना ०.३७ एफएसआय अतिरिक्त दिला जात असे. मध्य पुण्यात तसेच गावठाण भागात वाडय़ांची संख्या अधिक असल्यामुळे दीडऐवजी अडीच एफएसआय द्यावा, अशी मागणी होती. महापालिका प्रशासनाने जुन्या हद्दीचा जो प्रारूप विकास आराखडा सन २०१३ मध्ये प्रसिद्ध केला होता. तो प्रकाशित करताना मध्य पुण्यात दीड एफएसआय प्रस्तावित करण्यात आला होता.
प्रत्यक्षात हा एफएसआय अडीच असावा अशी मागणी होती. त्यानुसार तो अडीच करण्याऐवजी दीड करण्यात आल्यामुळे शहरात जोरदार प्रतिक्रिया उमटली होती. त्यावर ही छपाईतील चूक असल्याचे व ती नंतर दुरुस्त केली जाईल असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. छपाईतील या चुकीमुळे मध्य पुण्यातील एफएसआय होता त्यापेक्षाही कमी झाला. छपाईतील ही चूक सर्वप्रथम काँग्रेसचे प्रदेश चिटणीस, नगरसेवक संजय बालगुडे यांनी उघड केली होती. तसेच पुणे बचाव समितीनेही या चुकीबाबत अनेक आक्षेप उपस्थित करत ही चूक तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केले होते. पुणे बचाव समितीनेही आंदोलन केले होते.
जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ाला शहरातील हजारो नागरिकांनी हरकती-सूचना नोंदवल्यानंतर त्यावरील सुनावणी महापालिकेत पूर्ण झाली आहे. त्याबाबतचा अंतिम अहवाल शासननियुक्त नियोजन समितीने तयार केला असून या अहवालात एफएसआय संबंधीची चूक दुरुस्त करण्यात आली आहे. नियोजन समितीने जुन्या हद्दीतील बांधकामांना दीड ऐवजी अडीच एफएसआय प्रस्तावित केला असून या निर्णयामुळे एफएसआय वाढवून देण्याची मूळ मागणी मान्य झाली आहे. तसेच यापूर्वीच्या विकास आराखडय़ानुसार ज्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे तेथील रस्तारुंदी देखील रद्द करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:30 am

Web Title: fsi pmc sanjay balgude rectified
टॅग : Fsi,Pmc
Next Stories
1 पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, अमरावती येथे ग्राहक न्यायमंचाची खंडपीठे सुरू होणार
2 सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध व्हा – उद्धव ठाकरे
3 देशातील १०१ नद्यांमध्ये अंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन – नितीन गडकरी
Just Now!
X