फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) एका विद्यार्थ्यांला शुक्रवारी वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आल्यानंतर संस्थेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वरिष्ठ प्राध्यापकांशी गैरवर्तन केल्याच्या घटनेनंतर वसतिगृह सोडण्याची सूचना देऊन पंधरा दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांने वसतिगृह न सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

श्रीनिवास असे कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो ‘आर्ट डायरेक्शन अ‍ॅण्ड प्रॉडक्शन डिझाईन’च्या शेवटच्या वर्षांचा विद्यार्थी आहे. संस्थेच्या प्रशासनाने त्याला शुक्रवारी रात्री वसतिगृह सोडण्यास सांगितले. त्या वेळी रात्री उशिरा विद्यार्थ्यांला बाहेर कसे काढले असा प्रश्न उपस्थित करून संस्थेतील इतर विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी संस्थेबाहेर  होते.

याबाबत एफटीआयआयतर्फे माहिती देण्यात आली आहे. काही आठवडय़ांपूर्वी श्रीनिवास आणि मनोज कुमार या दोन विद्यार्थ्यांना वरिष्ठ प्राध्यापकाशी झालेल्या वादानंतर निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मनोज कुमार हा विद्यार्थी बेपत्ता झाला.

त्याबाबतची तक्रार पोलिस स्थानकात नोंदवल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो उत्तर प्रदेश येथे असून संपर्कात असल्याचे कळवले. श्रीनिवास बाबत बेशिस्त आणि गैरवर्तनाच्या तीन तक्रारी होत्या. गैरवर्तनाची कबुली देऊन त्याबाबत माफी मागण्याची समज देऊन देखील त्याने माफी न मागितल्याने त्याला वसतिगृह सोडण्याची सूचना देण्यात आली. वसतिगृह सोडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतदेखील देण्यात आली होती. शुक्रवारी ही मुदत संपली. मात्र त्याने वसतिगृह न सोडल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.