राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतून (एफटीआयआय) चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला विद्यार्थी सापडला आहे. प्राध्यापकांशी गैरवर्तन केल्या प्रकरणी कारवाई केल्यानंतर बेपत्ता झालेला विद्यार्थी उत्तर प्रदेशातील नातेवाइकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली आहे.

मनोज कुमार ( रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्या प्रकरणी मनोज आणि श्रीनिवास या दोन विद्यार्थ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्यात आली होती. दोघांना संस्थेतून निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर श्रीनिवास त्याच्या मूळगावी गेला. त्याने याबाबत प्रशासनाला माहिती दिली. मात्र, मनोजने प्रशासनाला कोणतेही माहिती दिली नाही. तो बेपत्ता झाल्याची तक्रार डेक्कन पोलिसांकडे देण्यात आली होती.

डेक्कन पोलिसांनी त्याचे मित्र आणि नातेवाइकांकडे चौकशी केली. तेव्हा मनोज उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्य़ात मावशीच्या घरी असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. कारवाई केल्यानंतर निराश झालेला मनोज मावशीकडे गेला. त्याचा मोबाइल हरविल्याने संपर्क होऊ शकला नव्हता. पोलिसांनी मनोजशी पुन्हा संपर्क साधला तेव्हा तो मावशीच्या घरी सुखरूप असल्याचे उघडकीस आले. असे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.