पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या (एफटीआयआय) धर्तीवर पंजाबमध्ये स्वायत्त स्वरूपाची चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे. या संदर्भात एफटीआयआयबरोबर सामंजस्य करार देखील करण्यात येणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी मंगळवारी एफटीआयआयला भेट दिली. या वेळी त्यांनी हा मनोदय बोलून दाखवला.
बादल म्हणाले, ‘चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रात अभिनयाबरोबरच तांत्रिक विभागातही भरपूर संधी आहेत. योग्य प्रशिक्षण व कौशल्ये आत्मसात केल्यास या क्षेत्रातून पंजाबमधील ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी एफटीआयआयच्या धर्तीवर चंदीगडला चित्रपट व दूरचित्रवाणी प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.’
या संस्थेसाठी एफटीआयआयचे सहकार्य घेण्यात येणार असून संस्थेला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसंबंधी चर्चा करण्यासाठी एफटीआयआयचे संचालक डी. जे. नरेन यांनी चंदीगडला भेट द्यावी, असे निमंत्रण पंजाब सरकारचे मुख्य सचिव के. जी. एस. चिमा यांनी नरेन यांना दूरध्वनीवरून दिले आहे.