‘व्हरायटी’ नियतकालिकाच्या अहवालात स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था

पुणे : गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ चित्रपट प्रशिक्षणात कार्यरत असलेल्या, गुणवान कलाकार घडवणाऱ्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाला आहे. अमेरिकेतील ‘व्हरायटी’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने या संस्थेच्या कामगिरीची दखल घेतली आहे. या नियतकालिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात जगातील सर्वोत्तम चित्रपट संस्थांमध्ये ‘एफटीआयआय’चा समावेश केला आहे. सर्वोत्तम चित्रपट प्रशिक्षण संस्थांच्या यादीत स्थान मिळवणारी ‘एफटीआयआय’ ही भारतातील एकमेव संस्था ठरली आहे.

‘व्हरायटी’ हे अमेरिकन साप्ताहिक मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील एक अतिशय प्रतिष्ठेचे नियतकालिक म्हणून प्रसिद्ध आहे. १९०५ मध्ये सुरू झालेल्या या नियतकालिकामध्ये जागतिक पातळीवरील मनोरंजन क्षेत्रातील घटना, घडामोडी, स्थित्यंतरे टिपली जातात. जागतिक पातळीवरील चित्रपट प्रशिक्षण संस्थांचा अभ्यास करून तयार केलेला ‘एन्टरटेन्मेंट एज्युकेशन रिपोर्ट – द बेस्ट फिल्म स्कूल्स इन २०१८’ हा अहवाल ‘व्हरायटी’तर्फे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या विषयी नियतकालिकाकडून ‘एफटीआयआय’ला माहिती कळवण्यात आली. जगभरातील महत्त्वाच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थांनी केलेली शिक्षण आणि शिक्षणेतर कामगिरी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या कामगिरीविषयी ‘प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना काम करण्याची मुभा देणारी संस्था’ असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.

आशियातील सर्वात मोठे फिल्म स्कूल असा नावलौकिक असणारी बीजिंग फिल्म अ‍ॅकॅडमी (चीन) आणि इस्रायल येथील तेल अवीव विद्यापीठाचा ४० संस्थांच्या यादीत आशियातून समावेश करण्यात आला आहे. तर, उर्वरित संस्था ह्य प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेतील आहेत.

अध्यक्षांकडून कौतुकाचे ट्विट

‘व्हरायटी’कडून मिळालेल्या या सन्मानाविषयी ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कौतुकाचे ट्विट केले. ‘धिस इज ब्रिलियंट. अभिनंदन. जय हो!’ अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.