|| चिन्मय पाटणकर

माजी विद्यार्थिनी क्षमा पाडळकरचा माहितीपट ‘स्ट्राईक अँड आय’

अभिनेते गजेंद्र चौहान यांची चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपामागील ‘महाभारत’ आता माहितीपटातून उलगडणार आहे. संप काळात विद्यार्थिनी असलेल्या क्षमा पाडळकरने संपावर आधारित ‘स्ट्राईक अँड आय’ हा माहितीपट केला आहे. महोत्सवांच्या माध्यमातून हा माहितीपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा तिचा मनोदय आहे.

केंद्रात मोदी सरकार येऊन जेमतेम वर्षभर होते ना होते तोच, पुण्यातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) ‘महाभारत’ घडले. अनेक मान्यवरांनी अध्यक्षपद भूषवलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेता म्हणून सुमार कारकिर्द असलेल्या गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाली. विद्यार्थ्यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला ; सरकार संस्थेचे भगवीकरण करत असल्याचा आरोप करत संप पुकारला. जवळपास पाच महिने हा संप सुरू होता. या संपाची देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा झाली होती. मंगळवारी (१२ जून) या संपाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. संप मिटल्यानंतर पुढील काळात क्षमा पाडळकरने संप काळात केलेल्या चित्रीकरणाचे संकलन-संपादन करून ‘स्ट्राईक अँड आय’ हा माहितीपट तयार केला आहे. संपाच्या काळात क्षमा संस्थेत शिकत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संपाचे नियोजन, गुप्त बैठका, आपापसांतील भांडणे, सरकारविरोधातील उपोषण, विद्यार्थ्यांना झालेली अटक असे चित्रीकरण या माहितीपटात आहे.

‘संप सुरू झाल्यावर त्यात सहभागी व्हायचे की नाही, हे कळत नव्हते. हा संप राजकीय असल्याचे त्या वेळी बोलले जात होते. त्यामुळे कॅमेरा घेऊन थेट चित्रीकरण सुरू केले. त्यातून मला बरेच काही कळत होते. चित्रीकरण करताना मला कोणीच विरोध केला नाही. संस्थेतील विद्यार्थी संघटनेच्या बैठका, अगदी गुप्त चर्चाचेही चित्रीकरण केले. त्यामुळे खूप तटस्थपणे या संपाकडे पाहता आले,’असे क्षमाने सांगितले.

‘विद्यार्थ्यांच्या संपामागे केवळ राजकीय किंवा नियुक्तीसाठीचा विरोध नव्हता, तर सरकार संस्थेची स्वायत्तता काढून घेण्याचा, संस्थेच्या खासगीकरणाचाही मुद्दा त्यामागे होता. संपात सहभागी व्हायचे की नाही, या प्रश्नापासून ते संपात सहभागी होण्याचा माझा वैयक्तिक प्रवासही या माहितीपटात आहे,’ असेही तिने सांगितले. या माहितीपटाचा ट्रेलर क्षमाने समाजमाध्यमांमध्ये पोस्ट केला आहे.

७० तासांपेक्षा जास्त चित्रीकरण!

संप सुरू झाल्यापासून पुढील चाळीसहून अधिक दिवसांचे, ७० तासांपेक्षा जास्त वेळाचे चित्रीकरण क्षमाने केले. या चित्रीकरणातून संकलन करत क्षमाने १०७ मिनिटांचा माहितीपट साकारला आहे. संपाचे वातावरण निवळल्यानंतर क्षमाने माहितीपटाची तयारी सुरू केली आणि पुढील दोन वर्षांत या माहितीपटाचे संकलन केले.

विद्यापीठे, महोत्सवांमध्ये दाखवणार

भारतातील एका महत्त्वाच्या संस्थेत झालेला संप, त्याची पाश्र्वभूमी याचे दस्तऐवजीकरण या माहितीपटाच्या रुपाने झाले आहे. जूनच्या अखेरच्या आठवडय़ात हा माहितीपट एफटीआयआयमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. तसेच विविध महोत्सवांमध्येही पाठवण्यात येणार आहे.