पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता, माहिती व प्रसारण मंत्रालयाने या प्रश्नी कोंडी फोडण्यासाठी सर्व संबंधित प्रश्नांवर चर्चेची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाटी राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चढाओढ लागली असून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मंगळवारी आंदोलनाच्या समर्थनार्थ एफटीआयआय गाठले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यार्थी संघटनेच्या पत्रास उत्तर पाठवले असल्याची माहिती एफटीायआयचे संचालक डी. जे. नरेन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘स्टुंडटस असोसिएशन ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इन्स्टिटय़ूट’ या संघटनेचे अध्यक्ष हरीशंकर नचीमुथू यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. नरेन म्हणाले, ‘एफटीआयआयच्या संचालक मंडळावर कुणाचीही नियुक्ती करण्याचा अधिकार माहिती व प्रसारण मंत्रालयाला असल्याचे मंत्रालयाने सांगितले असून  संस्थेमधील सुधारणा आणि नियुक्यांबद्दल विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांबद्दल चर्चा करण्यास सरकार तयार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाशी निगडित गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्याच सुरू ठेवाव्यात असेही मंत्रालयाने सांगितले आहे.’
विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला म्हणाले, ‘संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि इतर काही सदस्यांचे कार्य एफटीआयआयच्या प्रतिष्ठेस अनुकूल नाही. चौहान यांनी एका वाहिनीशी बोलताना आपण विद्यार्थ्यांना अभिनय शिकवू शकत नाही, परंतु आपला प्रशासकीय अनुभव चांगला आहे, असे म्हटले आहे. परंतु संचालक मंडळाचे अध्यक्षपद हे केवळ प्रशासकीय पद नसून त्यासाठी कलेची दृष्टी असलेली व्यक्ती आवश्यक आहे. आम्ही आपली विचारधारा संस्थेच्या दाराबाहेर ठेवून येऊ असेही चौहान म्हणतात, परंतु कोणतीही व्यक्ती तिच्या विचारांच्या पायावरच उभी असते. चौहान यांनी त्यांच्या मंडळातील काही सदस्यांची वक्तव्येही लक्षात घ्यावीत. या संस्थेत एक विशिष्ठ विचारधारा रुजवण्याचे सूचन हे सदस्य करतात. मंत्रालयाने चर्चेस प्रस्ताव देणे ही सकारात्मक बाब आहे, परंतु मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन संपणार नाही.’
१८ जूनला एफटीआयआयमधून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी देशभरातून संस्थेत येणार असून  या दिवशी सकाळी ११ वाजता ते या आंदोलनाला समर्थन देणार आहेत, असेही शुक्ला यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व दिल्लीची ऑल इंडिया स्टुडंटस असोसिएशन यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कोलकात्यात सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट या संस्थेतही निदर्शने करण्यात आली.
व्यक्तिगत मुद्दय़ावरुन राजकारण होत आहे
– गजेंद्र चौहान
दरम्यान गजेंद्र चौहान यांनी सांगितले की, ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत त्यामुळे हा आपल्याविरोधात कट आहे. हा व्यक्तीगत मुद्दा करण्यात आला असून त्यावर राजकारण खेळले जात आहेत. विद्यार्थ्यांनी राजकारणापासून दूर रहावे कारण ते त्यांच्या फायद्याचे नाही. माहिती व प्रसारण मंत्रालयाने आपली मुलाखत घेतली व त्यानंतर नियुक्ती केली आहे, हा निर्णय एका रात्रीत कुणा एकाने घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया चौहान यांनी दिली.