रुपी सहकारी बँकेवर सहकार विभागाने पूर्ण वेळ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मधुकांत गरड यांची नियुक्ती केली आहे. गरड हे यापूर्वी प्रतिनियुक्तीवर महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत होते. या पदाच्या नियुक्तीने बँकेच्या कर्जवसुलीच्या प्रक्रियेला वेग मिळू शकणार आहे.

रुपी बँकेचा कारभार सध्या प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येतो आहे. बँकेवर सहकार विभागाचा पूर्ण वेळ अधिकारी असावा, अशी मागणी प्रशासकीय मंडळाकडून करण्यात येत होती. त्यानुसार ही नेमणूक करण्यात आल्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी स्पष्ट केले. थकबाकीची वसुली करण्याबरोबरच कारवाई करण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे थकबाकीच्या वसुलीला वेग येऊन ठेवीदारांना दिलासा मिळू शकेल, असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला.

बँकेच्या कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने मान्यता दिली आहे. या प्रक्रियेचा खर्च रिझव्‍‌र्ह बँकेकडून केला जाणार आहे.