हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) हृषीकेश मुळगावकर यांना शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुळगावकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुळगावकर यांचे गुरुवारी (९ एप्रिल) लष्करी रुग्णालयात (कमांड हॉस्पिटल) निधन झाले. त्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश हे लंडन येथून भारतात परतल्यानंतर मुळगावकर यांच्या पार्थिवावर गोळीबार मैदानाजवळील मुक्तिधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी मुळगावकर यांचे पार्थिव दुपारी लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्कराच्या तीनही दलांतर्फे पुष्पचक्र वाहून मुळगावकर यांना अभिवादन करण्यात आले. हवाई दलाच्या दक्षिण-पश्चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल सी. हरी कुमार आणि लष्कराच्या लोहगाव तळाचे प्रमुख एअर कमोडोर अवधेश भारती यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयापासून मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. लष्करी बँडपथकाने मुळगावकर यांना मानवंदना अर्पण केली. बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) पी. व्ही. नाईक, माजी उपप्रमुख एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) पी. एस. िपगळे आणि भूषण गोखले, कर्नल (निवृत्त) अनिल आठल्ये यांच्यासह सेवानिवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
…………
श्रद्धांजली :
एअर चीफ मार्शल (निवृत्त) पी. व्ही. नाईक-
हवाई दलाला लाभलेले तगडे आणि कणखर नेतृत्व. मुळगावकर मिश्कील स्वभावाचे होते. त्यांनी हवाई दलाचे नेतृत्व प्रभावीपणे केले. तेजपूर येथे आम्ही त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला होता. स्क्वाड्रन लीडर असल्याने या कार्यक्रमाचे नेतृत्व माझ्याकडे होते. मी सॅल्युट केला तेव्हा मुळगावकर यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा त्यांनी सॅल्युट केला होता. त्यामुळे मीच गोंधळात पडलो होतो. अखेर त्यांनी हस्तांदोलन केले.
.
एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) पी. ए. पिंगळे-
हवाई दलाचे सामथ्र्य घडविण्यामध्ये मुळगावकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९४८ मध्ये पाकिस्तानी घुसखोर काश्मीरमध्ये घुसले तेव्हा श्रीनगर विमानतळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न मुळगावकर यांच्यामुळे अयशस्वी ठरला. त्या वेळी त्यांनी बेस कमांडर म्हणून काम केले. बेस कमांडरने ‘फ्लाईंग’ करायचे नसते. मात्र, मुळगावकर स्वत: विमानाचे पायलट झाले होते.
.
एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) भूषण गोखले-
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या संचलनाचे नेतृत्व मुळगावकर यांनी केले होते. दलाला उत्कृष्ट विमाने मिळावीत यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी भक्कम केलेल्या पायावरच हवाई दल सामर्थ्यांने उभे आहे.