बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

पुणे : सम-विषम दिनांक न पाहता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच बेशिस्तीने लावण्यात आलेली वाहने हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने ओढून नेणाऱ्या कंपनीने टोइंग शुल्कात वाढ केली आहे. नो-पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनचालकांकडून दंड, टोइंग शुल्क तसेच वस्तू आणि सेवा करानुसार (जीएसटी) शुल्क आकारण्यात येत आहे. यापुढील काळात दुचाकीसाठी ४६० रुपये आणि चारचाकीसाठी ७२० रुपये भरावे लागणार आहेत.

दुचाकी टोइंग शुल्कात २० रुपये आणि चारचाकींसाठी ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शहरात बेशिस्तपणे वाहने लावण्यात येतात. आखून देण्यात आलेल्या पट्ट्यांच्या बाहेर वाहने लावणे तसेच सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावली जातात. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून टोइंग क्रेनच्या साहाय्याने कारवाई करण्यात येते. दोन वर्षांपूर्वी दुचाकी उचलून टेम्पोत टाकली जात होती. त्यामुळे वाहनांचे नुकसान व्हायचे. अशा प्रकारांमुळे वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादावादीचे प्रसंग घडायचे. त्यामुळे २०१९ मध्ये वाहतूक पोलिसांनी यांत्रिक पद्धतीने वाहने उचलणाऱ्या टोइंग व्हॅनला वाहने उचलण्याचे कंत्राट दिले. विदर्भ इन्फोटेक या कंपनीकडून शहरातील वाहने टोइंग केली जात असून वाहने उचलण्यासाठी कामगारांची गरज नसून यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जात आहेत.

या कंपनीकडून वाहने उचलण्यासाठी दुपटीने रक्कम वसूल केली जाते. सध्या टोइंग केलेली दुचाकी सोडविण्यासाठी ४६० रुपये आणि चारचाकींसाठी ७२० रुपये मोजावे लागत आहेत. सप्टेंबर महिन्यांपासून ही वाढ केली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

अशी होती आकारणी

नो-पार्किंगमध्ये दुचाकी किंवा चारचाकी वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून २०० रुपये दंड आकारण्यात येतो. सुरुवातीला दुचाकी टोइंगसाठी २०० रुपये आणि ३६ रुपये वस्तू आणि सेवा (जीएसटी) मिळून ४३६ रुपयांचा दंड आकारला जात होता. आता दुचाकी टोइंगमध्ये २० रुपये आणि चारचाकी टोइंगसाठी ४० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रक्कम वाढल्याने जीएसटीतही वाढ झाली आहे. त्यामुळे आता दुचाकीसाठी प्रत्येकी २२० रुपये टोइंग, २०० रुपये दंड आणि ४० रुपये जीएसटी असे ४६० रुपये भरावे लागणार आहेत. चारचाकी वाहनांसाठी ४४० रुपये टोइंग, २०० रुपये दंड आणि ८० रुपये जीएसटीसह ७२० रुपये आकारण्यात येत आहेत.

रस्त्यावर सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावल्यानंतर, आखून दिलेल्या पट्ट्यांच्या बाहेर वाहने लावण्यात आल्यानंतर कारवाई करण्यात येते. वाहने उचलण्याचे काम करणाऱ्या कंपनीकडून टोइंग शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या कंपनीबरोबर झालेल्या करारानुसार टोइंगसाठी वार्षिक दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. – राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा