परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यावर वेळापत्रक

पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी आदी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) भवितव्य बारावीच्या परीक्षेवर अवलंबून आहे. सीईटी आयोजित करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत असून, बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यावर सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. राज्यातील जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठा टक्का अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, संगणकशास्त्र, विधी, हॉटेल मॅनेजमेंट अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतो. त्यासाठी त्यांना जेईई, नीट या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा, तर राज्यातील सीईटी द्यावी लागते.

करोनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने करोनाच्या प्रादुर्भावामुळे जेईई, नीट पुढे ढकलल्या आहेत. तसेच अद्याप सीईटीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. बारावीची परीक्षा पुढे गेल्याने दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या सुधारित वेळापत्रकानुसार होणारी परीक्षा, सीईटी या दरम्यान तयारीसाठी थोडा वेळ मिळण्याची काळजीही शिक्षण विभागाला घ्यावी लागणार आहे.

प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे नियोजन

सीईटी सेलकडून सुरू असलेल्या कामांसाठी विविध परीक्षांसाठीचे प्रश्नसंच तयार करणे आणि अन्य कामांचा समावेश आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर झाला होता. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात सीईटी झाल्यानंतर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.

राज्यातील संस्थांच्या प्रवेशासाठी सीईटी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सीईटी सेलकडून आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या, की सीईटीअंतर्गत होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. – चिंतामणी जोशी, सीईटी   सेलचे आयुक्त