19 November 2019

News Flash

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज

राज्य मंडळाच्या तुलनेत अन्य मंडळाचे विद्यार्थी १४.०८ टक्के

संग्रहित छायाचित्र

राज्य मंडळाच्या तुलनेत अन्य मंडळाचे विद्यार्थी १४.०८ टक्के

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील २८९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (१२ जुलै) सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या तुलनेत अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १४.०८ टक्के असल्याची माहिती केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने दिली.

यंदा सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या तुलनेत राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात घसरण झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी प्रवेश अर्जाची आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. प्रवेश प्रक्रियेत एकूण ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यात ३० हजार ५७२ मुली आणि ३२ हजार ९९४ मुलांचा समावेश आहे. राज्य मंडळाच्या ५५ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी प्रवेशांसाठी अर्ज केला आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ८५० आहे. त्यात सीबीएसईच्या ५ हजार ३६८, आयसीएसईच्या १ हजार ८३६, आयबीच्या १५, आयजीसीएसईच्या ४९, एनआयओएसच्या ३४६ आणि अन्य मंडळांच्या २३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आता आज जाहीर होणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीत नामांकित महाविद्यालयांमध्ये अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळाच्या किती विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होतात, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य सरकारने १९ नामांकित महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढवून दिल्या असल्या, तरी पहिल्या फेरीत जवळपास ९५ टक्के किंवा त्याहून अधिक कटऑफ असलेल्या महाविद्यालयात राज्य मंडळाच्या किती विद्यार्थ्यांना जागा मिळतात हे स्पष्ट होईल.

४० हजारहून अधिक जागा रिक्त राहणार

समितीने जाहीर केलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, एकूण १ लाख ४ हजार १३९ जागांवर अकरावी प्रवेश प्रRि या राबवली जात आहे. त्यात कला शाखेत मराठी माध्यमासाठी ८ हजार १४४ जागा, इंग्रजी माध्यमासाठी ६ हजार ७०१ जागा मिळून एकूण १४ हजार ८४५ जागा उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेत मराठी माध्यमासाठी १३ हजार ४ आणि इंग्रजी माध्यमासाठी २८ हजार ३९३ जागा अशा एकूण ४१ हजार ३९७ जागा, विज्ञान शाखेच्या ४३ हजार ४३२ जागा उपलब्ध आहेत. तसेच द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या २ हजार ९४५ जागांवर प्रवेश प्रक्रिया होईल. मात्र, जागांच्या तुलनेत आलेल्या अर्जाची संख्या फारच कमी आहे. एकूण ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे ४० हजारहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on July 12, 2019 4:03 am

Web Title: fyjc admission first merit list for fyjc admissions will announced today zws 70
Just Now!
X