शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयांना शिक्षण विभागाकडून दिलेल्या झुकत्या मापाचा फटका दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही लहान महाविद्यालयांना बसला आहे. शहरातील रिक्त राहिलेल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा या लहान कनिष्ठ महाविद्यालयांमधील आहेत. सुविधा नाहीत त्यामुळे विद्यार्थी येत नाहीत आणि विद्यार्थी नाहीत त्यामुळे उत्पन्नही कमी होते, अशा दुष्टचक्रात ही महाविद्यालये अडकली आहेत.
या वर्षी दहावीचे निकाल चांगले लागल्यामुळे लहान महाविद्यालये, कला शाखेच्या महाविद्यालयांसाठी आशादायक चित्र होते. प्रत्यक्षात मात्र या वर्षीही लहान महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अकरावीच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयांना आणि शिक्षणसंस्थांना शिक्षण विभागाकडून झुकते माप मिळण्याची परंपरा जुनीच आहे. या वर्षीही मोठय़ा महाविद्यालयांच्या पूर्वी मान्यता नसलेल्या काही तुकडय़ा मान्य करण्यात आल्या. त्यामुळे अगदी शेवटच्या फेरीत किंवा यानंतर होणाऱ्या प्रवेशफेरीतही प्रतिष्ठित महाविद्यालयांच्या जवळपास दोन तुकडय़ांच्या जागा रिक्त दिसत आहेत. काही महाविद्यालयांमध्ये मराठी माध्यमातून अभ्यासक्रम चालवण्यासाठी महाविद्यालयाला मिळालेली तुकडी या वर्षी इंग्रजी माध्यमात दाखवण्यात आली.  साहजिक महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त दिसत असल्यामुळे प्रवेश बदलून मिळण्याची संधी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून प्रतिष्ठित महाविद्यालयांनाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या वर्षीही लहान किंवा तुलनेने कमी प्रतिष्ठित असलेल्या महाविद्यालयांची परिस्थिती वाईटच आहे.
महाविद्यालयाला पुरेसे विद्यार्थी मिळाले नाहीत, की त्यातील शिक्षक अतिरिक्त ठरतात. अनेकदा या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा भार महाविद्यालयावरच येतो. विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क हा महाविद्यालयाच्या उत्पन्नाचा एक स्रोत असतो. मात्र, विद्यार्थी मिळाले नाहीत की त्याचा परिणाम शिक्षणसंस्थांवर होत असतो. दुसरीकडे लहान महाविद्यालयांमध्ये पुरेशा सुविधा असत नाहीत, अशी तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत असते, त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी या लहान महाविद्यालयांना प्राधान्य दिले जात नाही. सुविधा नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत आणि विद्यार्थीच मिळत नाहीत त्यामुळे सुविधा देणे परवडत नाही, अशा दुष्टचक्रात महाविद्यालये अडकली आहेत.
याबाबत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले, ‘दरवर्षी जागा रिक्त राहात असतानाही शिक्षण विभाग मोठय़ा महाविद्यालयांना तुकडय़ा वाढवून देतात. त्याचा परिणाम लहान महाविद्यालयांवर होतच असतो. त्याऐवजी लहान महाविद्यालयांनाही सुधारण्याची संधी शिक्षण विभागाने दिली पाहिजे. तुकडी वाढ न देता कमीतकमी जागा रिक्त राहाव्यात यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषत: शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना ही अडचण अधिक येते.’