२६ हजार ५२० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर होऊनही जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. पहिल्या यादीत २६ हजार ५२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून २१ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अकरावीच्या प्रवेशांसाठी अर्ज केलेल्या ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ७०१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झाला होता. त्यातील २४ हजार ३६४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले होते.

पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १६ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यातील केवळ २६ हजार ५२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. १४१ विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आला असून, ७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्याची माहिती प्रवेश समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी दिली.

पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज क्रमांक आणि बैठक क्रमांक प्रतिबंधित (ब्लॉक) करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना थेट चौथ्या फेरीत सहभागी होता येईल. तसेच पसंतीक्रमांक २ ते १० पैकी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचेही अर्ज क्रमांक आणि बैठक क्रमांक प्रतिबंधित करण्यात आले असून, त्यांनाही चौथ्या फेरीत सहभागी होता येईल. दुसऱ्या फेरीसाठी १७ आणि १८ जुलैला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येईल. २२ जुलैला सायंकाळी सहा वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.