राजकीय व्यक्तींची स्मारके उभे करा अथवा करू नका. मात्र, ज्या कवींचे, लेखकांचे लेखन दोनशे ते तीनशे वर्ष राहणार आहे. त्यांची स्मारके का उभारली जात नाही, त्यांच्या स्मारकासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कवी आणि गीतकार ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले. गदिमांचे स्मारक उभारण्यासाठी माझे सदैव प्रयत्न राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘गदिमा पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे यांना महानोर यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त अनंत माडगूळकर, श्रीधर माडगूळकर उपस्थित होते. या वेळी विद्या प्रज्ञा पुरस्कार प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी, चैत्रबन पुरस्कार कवी व लेख गुरू ठाकूर आणि गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक मधुरा जसराज यांना देण्यात आला.
लोककलेला लोकप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम गदिमांनी केले. त्यांचा आशीर्वाद घेऊन आमची वाटचाल सुरू आहे, असे सांगत महानोर म्हणाले, की गदिमांच्या नावाने मिळालेला पहिला पुरस्कार हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस होता. त्यांचा सहवास आणि आशीर्वाद घेऊनच माझी वाटचाल सुरू आहे. हजारोंच्या मनावर राज्य करतो तोच खरा कवी असतो.
पुरस्काराला उत्तर देताना मोघे म्हणाले, की महाराष्ट्राच्या वाल्मीकीच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद माडगूळकर यांनी केले, तर प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.