News Flash

गदिमांच्या निवडक कथा आता इंग्रजीमध्ये!

जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने भेट; आत्मकथनाचाही अनुवाद होणार

|| चिन्मय पाटणकर

जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने भेट; आत्मकथनाचाही अनुवाद होणार

मराठीमध्ये सकस साहित्य असूनही ते आंतरराष्ट्रीय पटलावर जाण्यासाठी इंग्रजी अनुवादाची यंत्रणा कमी पडते. जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगूळकर यांच्या निवडक कथा इंग्रजीत गेल्या, मात्र त्यालाही मर्यादा होती. अलीकडच्या काळात मकरंद साठे, सचिन कुंडलकर यांच्या ताज्या कादंबऱ्यांना इंग्रजीचा वर्ख लाभला. आता साक्षात आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे गद्यसाहित्य इंग्रजी वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे.

गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गीतरामायणासह गदिमांनी चित्रपटलेखन, कथा, कविता, कादंबरी, आत्मपर लेखन असे विपुल लेखन केले आहे. त्यापैकी गीतरामायण इंग्रजीत गेले. मात्र गद्य लेखन इंग्रजीत कधीही अनुवादित झाले नव्हते.

‘गेली दोन वर्षे कथांच्या अनुवादाचे काम सुरू होते. श्रीधर माडगूळकर यांच्याशी अनेक वर्षांचा स्नेह आहे. एकदा अनौपचारिक गप्पांमध्ये गदिमांचे साहित्य इंग्रजीमध्ये रूपांतरित व्हावे, असा मानस त्यांनी व्यक्त केला होता. गदिमांचे लेखन अप्रतिम आहे. गदिमांसारखा मराठीतील महत्त्वाचा लेखक भारतातील आणि जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे निवडक साहित्य इंग्रजीत करण्याचे ठरवले. हा अनुवाद केवळ साहित्यसेवेच्या भावनेतून करत आहे,’ असे अनुवादक प्रा. विनया बापट यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘गदिमांच्या या इंग्रजीतील अनुवादित कथा पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, इंग्रजीतील काही प्रकाशकांशी बोलणी सुरू आहेत. त्यामुळे गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षांत या कथा पुस्तकरूपाने प्रकाशित होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने गदिमांचे साहित्य भारतातील इतर भाषक, जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचू शकेल. आजच्या पिढीवर इंग्रजीचा प्रभाव आहे. मराठी साहित्य वाचण्याकडे तितकासा कल नाही. त्यामुळे गदिमांच्या कथा इंग्रजीत अनुवादित झाल्यास त्या नव्या पिढीपर्यंत सहज पोहोचतील. या इंग्रजी कथा वाचून नवी पिढी कदाचित गदिमांच्या मूळ मराठी साहित्याकडेही वळेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

कथा कोणत्या?

गदिमांच्या ‘थोरली पाती’, ‘सोने आणि माती’, ‘भाताचे फूल’,‘ कृष्णाची करंगळी’, ‘बोलका शंख’ यांतील चौदा कथांची अनुवादासाठी निवड करण्यात आली. या कथांचा अनुवाद पूर्ण झाला असून,  https://www.facebook.com/gdmadgulka या फेसबुक पेजवर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.

आत्मकथनही अनुवादाच्या वाटेवर

पुण्यातील प्रा. विनया बापट यांनी गदिमांच्या निवडक कथा इंग्रजीमध्ये अनुवादित केल्या असून, गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये या कथा पुस्तक रूपाने वाचता येणार आहेत. गदिमांच्या निवडक कथांसह ‘वाटेवरच्या सावल्या’ या आत्मकथनाचाही अनुवाद बापट करत आहेत. या आत्मकथनाच्या अनुवादाचेही काम अंतिम टप्प्यात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:28 am

Web Title: gajanan digambar madgulkar poetry in english
Next Stories
1 शिवराज्याभिषेकानंतर रायगडावरुन उतरताना डोक्यात दगड पडून एका शिवभक्ताचा मृत्यू
2 मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेना वाचवण्यासाठी पाच जणांना अटक, एल्गार परिषदेच्या संयोजकांचा आरोप
3 पती-पत्नीने बँक ऑफ महाराष्ट्रला ७० लाख रुपयांना फसवले
Just Now!
X