News Flash

योगेश लेले यांनी तयार केलेल्या घडय़ाळांच्या डायलचे अमेरिकेतील प्रदर्शनात दालन

जुन्या घडय़ाळांना नवजीवन देणाऱ्या पुण्यातील योगेश लेले यांच्या अनोख्या कौशल्याचा अमेरिकेत सन्मान झाला आहे.

जुन्या घडय़ाळांना नवजीवन देणाऱ्या कौशल्याचा अमेरिकेत सन्मान

पुणे : जुन्या घडय़ाळांना नवजीवन देणाऱ्या पुण्यातील योगेश लेले यांच्या अनोख्या कौशल्याचा अमेरिकेत सन्मान झाला आहे. योगेश यांनी जुन्या घडय़ाळांच्या वैशिष्टय़पूर्ण ‘डायल’ हुबेहूब नव्याने तयार केल्या असून, अमेरिकेतील एका प्रतिष्ठित प्रदर्शनामध्ये त्यांच्या  डायलचे स्वतंत्र दालन करण्यात आले.

मुळचे अभियंता असलेले योगेश लेले माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहेत. पण लहानपणातून त्यांना जुन्या दुचाकी, मोटार आणि घडय़ाळे यांचे आकर्षण आहे. इंटरनेटवरील माहिती आणि ध्वनिचित्रफिती पाहून गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी जुन्या घडय़ाळांच्या डायल हुबेहूब तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले. काही जुन्या घडय़ाळांच्या डायल कागदावर केलेल्या असतात. या डायल हातमागाच्या कागदावर, लाकडावर जशाच्या जशा साकारण्याचे कौशल्य योगेश यांनी मिळवले आहे. त्यानंतर सातत्याने प्रयोग करून १८९० पासूनच्या परदेशी बनावटीच्या अनेक दुर्मिळ घडय़ाळांना त्यांनी नवजीवन प्राप्त करून दिले आहे. त्यासाठी ते सॉफ्टवेअरचा, अतिनील किरण मुद्रण (युव्ही प्रिटिंग) अशा तंत्रांचा वापर करतात. ‘नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर्स’ या संस्थेतर्फे अमेरिकेतील ओहोयो राज्यातील विल्मिंग्टन शहरात ३ ते ६ जून या दरम्यान झालेल्या प्रदर्शनामध्ये योगेश यांनी तयार केलेल्या डायल मांडण्यात आल्या.

घडय़ाळांना नवजीवन देण्याचे कौशल्य आणि अमेरिकेत मिळालेल्या सन्मानाबद्दल योगेश लेले यांनी माहिती दिली. ‘जुन्या घडय़ाळांची आवड असल्याने गेली तीन वर्षे  दुरुस्ती, डायल तयार करणे यांबाबतचा अभ्यास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी नव्याने केलेल्या डायलची छायाचित्रे समाजमाध्यमांत पोस्ट केली होती. ती छायाचित्रे पाहून अमेरिकेतील नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर्स या संस्थेचे सदस्य असलेल्या जो विल्कीन्स यांनी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्याकडील एका जुन्या घडय़ाळाची डायल करण्याविषयी विचारणा केली. ते स्वत: घडय़ाळजी आहेत. त्यांनी त्यांच्याकडील जुन्या घडय़ाळाची डायल पाठवल्यावर काही दिवसांत त्यांना हुबेहूब डायल करून दिली. माझ्या कामगिरीने आनंदित होऊन त्यांनी माझ्या संग्रहाबाबत विचारणा करून तो मागवून घेतला. त्यानुसार त्यांना मी तो पाठवला. त्यानंतर त्यांनी प्रदर्शनात माझ्या डायलचे स्वतंत्र दालन करून मांडणी केली. ही संस्था विविध देशांमध्ये प्रदर्शने भरवते, त्यात लिलावही होतात. मनगटावरची घडय़ाळे, खिशात ठेवायची घडय़ाळे, भिंतीवरची घडय़ाळे, टेबलवरची घडय़ाळे प्रदर्शनात मांडली जातात. ही संस्था जगभरात प्रतिष्ठित मानली जाते, विविध देशांमध्ये त्यांचे १३ हजारहून अधिक सदस्य आहेत, असे योगेश यांनी सांगितले.

जुनी घडय़ाळे टिकवणे आव्हानात्मक

माझ्या संग्रहात विविध काळातील, वैशिष्टय़पूर्ण घडय़ाळे, डायल समाविष्ट आहेत. अनेक प्रयोग करून रोमन अंक, बोधचिन्ह, टंक यांसह जुन्या डायल हुबेहूब नव्याने तयार केल्या आहेत. काही डायलवर हवा-पाण्याचा परिणाम होणार नाही अशा पद्धतीने लॅमिनेशनही केली. जुनी घडय़ाळे दुरुस्त करणारे मोजके च घडय़ाळजी असल्याने जुनी घडय़ाळे टिकवणे आव्हानात्मक आहे, असेही योगेश यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 2:54 am

Web Title: gallery of watch dials made by yogesh lele in the united states ssh 93
Next Stories
1 पुण्यात ७२ केंद्रांवर आज लसीकरण
2 ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून
3 पुस्तकांच्या दुकानांमध्ये पुन्हा लगबग
Just Now!
X