News Flash

पेट टॉक : प्राण्यांचे आभासी खेळगडी

हातात स्मार्ट फोन आणि घरात परदेशी कुत्रे किंवा मांजराचा प्रवेश यांचा अर्थाअर्थी काहीच संबध नाही.

हातात स्मार्ट फोन आणि घरात परदेशी कुत्रे किंवा मांजराचा प्रवेश यांचा अर्थाअर्थी काहीच संबध नाही. तरीही भारतात पाळीव प्राण्यांच्या उत्पादनांची बाजारपेठ आणि अँड्रॉईड फोन्सची बाजारपेठ ही साधारण एकाच कालावधीत बाळसे धरू लागली. मनोरंजनाकडे झुकणाऱ्या मानसिकतेला मोबाईल गेम्सनी अल्पावधीतच भुरळ घातली आणि घराबाहेर रंगणारे लगोरी, विटीदाडू, लपाछपी हे खेळही हातातल्या स्मार्टफोनमध्ये आले. या खेळांच्या आभासी दुनियेने घरातील पाळीव प्राण्यांनाही सामावून घेतले आहे. दोरीला बांधलेले रीळ, बॉल, लोकरीचा गुंडा पकडणे या कुत्र्यांच्या किंवा मांजरींच्या आवडीच्या खेळांची जागा मोबाईल किंवा टॅबच्या स्क्रिनवर पळणारा उंदीर पकडण्याची मजा प्राणी आणि ते पाहण्याची मजा पशुपालक घेत आहेत.

प्राण्यांच्या खेळाची दुनिया

काही दिवसांपूर्वी प्राणीप्रेमींमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जमिनीवर ठेवलेला आयपॅड, त्याच्या स्क्रिनवर पोहणाऱ्या माशाचे दृष्य आणि तो मासा पकडण्यासाठी प्रयत्न करणारे गुबगुबीत मांजर. माशावर पंजा मारला की सुळकन पुढे सरकणारा मासा आणि इतक्या जवळ असून मासा पकडता का येत नाही म्हणून अस्वस्थ झालेले मांजर, असे काहिसे त्या व्हिडिओचे स्वरूप होते. हा व्हिडिओ म्हणजे मांजरांसाठी तयार करण्यात आलेल्या खेळाच्या अ‍ॅपची एकप्रकारे जाहिरातच होती. प्राण्यांचा वेळ घालवणारी अनेक अ‍ॅप्स सध्या अँड्रोइड आणि आयफोनसाठीही उपलब्ध आहेत. स्क्रिनवर पळणारा उंदीर, झुरळ, माशी, कोळी, पोहोणारे मासे अशा स्वरूपातील हे खेळ आहेत. उंदीर, पक्षी यांच्या आवाजाची, खुडबुडीच्या आवाजाचीही जोड या अ‍ॅप्समध्ये आहे. अशाच प्रकारे भिंतीवर लेझर किरणांचा वापर करून प्राण्यांना खेळवण्यासाठीचीही अ‍ॅप्स आहेत. यातील पशुपालकांच्या पसंतीला उतरलेला अजून एक प्रकार म्हणजे आवाजांचे खेळ. कुत्रे किंवा मांजराचे वेगवेगळे आवाज या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मिळतात. त्या आवाजांना प्राणी प्रतिसाद देतात. मात्र हा खेळ प्राण्यांपेक्षा त्यांच्या पालकांसाठीच अधिक म्हणावा असा आहे.

उंदीर आणि मासे पशुपालक प्रिय

गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर नुसते कुत्री किंवा मांजरासाठीचे खेळ असे शोधले तरीही वेगवेळ्या प्रकारचे किमान वीस ते पंचवीस मोफत अ‍ॅप्स सहज मिळातात. यामध्ये ‘फिश गेम’, ‘माऊस गेम’, लेझर पॉईंटर फॉर कॅट, ‘कॅट टॉईज- आंटहंट कॅट’ अशा काही अ‍ॅप्सना पशुपालकांची पसंती मिळत आहे. यातील काही अ‍ॅप्स जगभरातून ३५ लाखांपेक्षा अधिक मोबाईल वापरकर्त्यांनी डाऊनलोड केल्याचे दिसून येते. या अ‍ॅप्सच्या उपयोगाबाबत पशुपालकांमध्ये मतमतांतरे आहेत. प्राणी या खेळांची मजा घेतात का, खूप वेळ या आभासी दुनियेत रमतात का, हा अजूनही पशुपालकांमध्ये थोडासा संभ्रमाचाच मुद्दा आहे. किंबहुना स्क्रिनवरचे मासे किंवा उंदीर हे त्यांना कळतात का याबाबतही मतमतांतरे आहेत. ही अ‍ॅप्स तयार करणाऱ्या कंपन्यांकडून मात्र प्राणी खूष होत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. वस्तुस्थिती काय याबाबत संभ्रम असला तरी ही अ‍ॅप्स प्राणीप्रेमींमध्ये चर्चेत मात्र नक्कीच आहेत.

खेळ आणि व्यायाम हवाच

बॉल मागे धावणे किंवा फिरायला जाणे यात प्राण्यांना विरंगुळा मिळण्यापेक्षाही त्यांना आवश्यक असणाऱ्या शारीरिक हालचाली मिळणे, व्यायाम होणे हा हेतू असतो. मोकळे असलेले कुत्रे किंवा मांजर हे एखादा पक्षी, पाल यांच्या मागे धावणे हे साहजिक आहे. त्यामध्ये खेळण्यापेक्षाही शिकार करणे हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे आभासी दुनियेतल्या उंदीर किंवा मासा पकडण्यात प्राणी काही काळ गुंततीलही मात्र त्यांना आवश्यक असा व्यायाम मिळण्यासाठी बॉल, दोरा यांच्यासारख्या खेळांना पर्याय नाही हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:12 am

Web Title: game for pet animals
Next Stories
1 अतिक्रमणांकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष
2 DEMONETIZATION OPINION BLOG : संघटित क्षेत्रातील काळ्या पैशांचे काय?
3 DEMONETIZATION OPINION BLOG : नोटाबंदीची लाज आणि मौज
Just Now!
X