गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या सूचना

गणेशोत्सव काळात प्रसाद तयार करण्यासाठी शिळा किंवा अनेक दिवस शीतकपाटात साठवलेला खवा वापरू नका, एका वेळी आवश्यक तेवढाच प्रसाद बनवा, प्रसादासाठीचा कच्चा माल परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा, प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवा, अशा सूचना ‘अन्न व औषध प्रशासना’तर्फे (एफडीए) शहरातील गणेश मंडळांना देण्यात येत आहेत.

अन्नपदार्थ तयार करताना मंडळांनी काय काळजी घ्यावी हे सांगणारे फलक व पत्रके गुरुवारपासून मंडळांना वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘एफडीए’चे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. त्याबरोबरच उत्सवकाळात मोठय़ा प्रमाणावर खरेदी-विक्री होणाऱ्या खवा, मिठाई, खाद्यतेल अशा पदार्थाचे नमुने घेण्याची मोहीमही सुरू केली जाणार आहे. प्रसाद ठेवण्यासाठी आणि वाटपासाठीची भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावीत, अन्नपदार्थ उत्पादनासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करावी, तसेच प्रसादात दूध व दुग्धजन्य पदार्थ असतील, तर त्यांची साठवणूक थंड राहतील अशा पद्धतीने करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘‘गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात शहर व ग्रामीण भागातही प्रसिद्ध देवस्थानांना भेट देऊन स्वच्छ वातावरणात प्रसाद तयार करण्याबाबत एफडीएतर्फे जनजागृती करण्यात आहे. अष्टविनायक मंदिरे, भीमाशंकर मंदिर, जेजुरी मंदिर अशा मोठय़ा देवस्थानांचा यात समावेश असणार आहे,’’ असेही देसाई यांनी सांगितले.