हिरव्या बोलीचे निसर्गकवी ना. धो. महानोर यांची अनोखी शब्दकळा, विविध वाद्यांचा सुयोग्य वापर करून आनंद मोडक यांनी दिलेले संगीत आणि वेगळाच रंग घेऊन आलेला ऊर्मिला धनगर या गायिकेचा मधुर स्वर असा त्रिवेणी संगम ‘गंध मातीचा’ या अल्बममधून घडून आला आहे. बुद्धवंदना, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या गीतांसह लावणी आणि मातीचा गंध उलगडणारी गीते हे या अल्बमचे वैशिष्टय़ आहे.
यापूर्वी ‘ओंजळीत स्वर तुझेच’ या अल्बममध्ये रवींद्र साठे यांच्या स्वरात ‘जन्माला आमुच्या काजळी दु:खाच्या वेदना’ हे ना. धों. महानोर यांचे एक गीत समाविष्ट होते. मात्र, महानोर यांच्याच सर्व गीतांचा अंतर्भाव असलेला हा पहिलाच अल्बम असल्याचे आनंद मोडक यांनी सांगितले.  ऊर्मिलाचा आवाज ऐकून महानोर यांनी हिच्यासाठी गीते लिहिण्याची इच्छा असल्याचे महानोर यांनी मला सांगितले होते. हे काम आता पूर्णत्वास गेले असून १७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील सावरकर प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि अशोक पत्की यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन होणार आहे. गायिका ऊर्मिला धनगर आणि उदय दिवाणे हे या अल्बमचे निर्माते आहेत.
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित यशवंतराव चव्हाण या चित्रपटाच्या संगीताची धुरा आनंद मोडक यांच्याकडे आहे. या चित्रपटातील गीते ऊर्मिला धनगर यांनी गायिली आहेत. या दरम्यान स्वत:चा अल्बम असावा आणि त्याला तुम्ही संगीत द्यावे, असा प्रस्ताव ऊर्मिलाने माझ्यापुढे ठेवला. तेव्हा महानोर यांचेच नाव डोळ्यासमोर आले आणि त्यांनीही लगेच गीते लिहून दिली. ऊर्मिलाच्या इच्छेनुसार बुद्धवंदना आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावरील एक गीत समाविष्ट करण्यात आले आहे. या अल्बमसाठी नरेंद्र भिडे यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी पेलली असल्याचे मोडक यांनी सांगितले.
‘तुम्हा वंदना प्रार्थना बुद्धदेवा, जगाला पुन्हा शांतीचा मार्ग दावा’ या बुद्धवंदनेसह ‘तुम्ही मोडली हो युगांची गुलामी, नवी ज्ञानगंगा झरे अंतरी, दिली भीमराया नवी चेतना अन् दिले लाविले दु:खितांच्या घरी’ हे गीत यामध्ये आहे. ‘रूप गं तुझं सकवार थोडं सांभाळ’ ही पिलू रागातील बैठकीची लावणी, ‘अजून वय माझं नवतीचं पोरी’ ही बोर्डावरची लावणी गाताना ऊर्मिलाचा आवाज खुलला आहे. ‘उजळ दाण्यांच्या ओटी भरल्या पांभरी, भरल्या पांभरी मेघ झुलती अंबरी’ (पेरणी), ‘हिरव्या रानाची झाली दैना मला भादवा सोसवेना’ (दुष्काळ) ‘बाई मी जोगवा जोगवा जोगवा मांगते माझ्या शेती मातीला पाणी गं मांगते (जोगवा) आणि ‘भरलं आभाळ शिवारात भरलं पीक पाणी पाखरांच्या चोची गातात नवी गाणी’ (भलरी) ही ग्रामीण जीवनातील मातीचा गंध उलगडणारी गीते यामध्ये आहेत, असेही मोडक यांनी सांगितले.