महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी संपादित केलेल्या ‘गांधीजी’ या छोटेखानी चरित्राचे पन्नाशीमध्ये पदार्पण झाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर १९७० रोजी प्रकाशित झालेल्या ‘गांधीजी’ या पुस्तकाला ज्येष्ठ चित्रकार एम. आर. आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादुई स्पर्श झाला होता.

वयाच्या पन्नाशीमध्ये असलेल्या पुलंनी सर्वसामान्यांना गांधीजींचे विचार समजावेत, या उद्देशातून तेव्हा हे पुस्तक लिहिले होते. आता पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांची शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सांगता होत असताना गांधीजी यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आणि राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘गांधीजी’ या चरित्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षांतील पदार्पण असा त्रिवेणी योग जुळून आला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पुलंनी व्यक्त केलेले मनोगत हेच पुरेसे बोलके आहे.

महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सा?ऱ्या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत, तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय यातून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे, असे पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे.

भारतातले सुप्रसिद्ध चित्रकार  मुरलीधरपंत आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादूचा स्पर्श या पुस्तकाला झाला. आता हे पुस्तक पाहताना मला असे वाटते,की आचरेकरांची चित्रेच इतकी बोलकी आहेत की, माझा मजकूर त्या चित्रांच्या बोलण्याच्या उगीचच मध्येमध्ये येऊ  लागला आहे. त्यांनी श्रद्धायुक्त अंत:करणातून केलेले हे कार्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल आभाराची भाषा वापरणे औचित्याला सोडून होईल. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. हे चरित्र लिहिताना फ्रान्सिस फ्रेट्स यांनी मला केलेल्या साहाय्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे, अशी भावना पुलंनी व्यक्त केली आहे.