४५०० मंडळांपैकी ११०० मंडळांकडून परवानगी प्रक्रिया

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपांसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केल्यानंतरही शहरातील सत्तर टक्के मंडळांनी मंडपांसाठी परवानगी घेतली नसल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील साडेचार हजार सार्वजनिक गणेश मंडळांपैकी अवघ्या एक हजार १०७ मंडळांनी मंडपासाठी महापालिकेकडून रीतसर परवानगी घेतली आहे. शहरात मंडप उभारण्यात आल्यानंतरही परवानगी देण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू असून गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतरही परवानगी देण्याचा खटाटोप सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सार्वजनिक समारंभांच्या आणि उत्सवांच्या प्रसंगी रस्त्यांवर तसेच पदपथांवर उभारण्यात येत असलेल्या मंडपासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ‘मंडप धोरण’ तयार केले आहे. या धोरणानुसार मंडपासाठी परवानगी देण्यासाठीची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्या धोरणानुसार या प्रक्रियेचे पालन करणे मंडळांना बंधनकारक असून उत्सवापूर्वी पाच दिवस आधी ही परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडपाची लांबी, रुंदी, उंची या बाबीही धोरणामध्ये निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र या नियमांचे सार्वजनिक मंडळांकडून सर्रास उल्लंघन करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच परवानगी घेण्याकडे मंडळांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे आले आहे.

शहर पोलिसांच्या आकडेवारीनुसार शहरात ४ हजार ४९९ मंडळे आहेत. पोलिसांची ही आकडेवारी महापालिका प्रशासनाने ग्राह्य़ धरली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून रीतसर परवानगी देताना मंडपाच्या लांबी-रुंदीची मापे गेल्या वर्षीच्या परवान्याप्रमाणे असल्याची कागदपत्रे, वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. यंदापासून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मंडळांना परवानगी देण्यात येत आहे. महापालिकेच्या आकेडवारीनुसार बुधवापर्यंत (२३ ऑगस्ट) या दोन्ही पद्धतीने मिळून अवघ्या १ हजार १०७ मंडळांनी परवानगी घेतली आहे. वास्तविक मंडळांना परवानगी देण्याची मुदत २२ ऑगस्ट रोजीच संपली आहे. मात्र त्यानंतरही गुरुवार अखेपर्यंत परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे विनापरवाना उभारलेल्या मंडपांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून विनापरवाना मंडपांवर महापालिका कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेला प्रतिसाद

मंडळांना यंदा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने परवानगी घेण्याला मंडळांनी पसंती दर्शविली असल्याचे दिसून येत आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयांनी १८६ कमानींना आणि ८५ रनिंग मंडपांना परवानगी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, रस्त्यांवर आणि पदपथांवर खड्डे घेणाऱ्या आणि विनापरवना मंडपांची उभारणी करणाऱ्या मंडळांची पाहणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.