सव्वाशे वर्षांत गणेशोत्सवात अनेक स्थित्यंतरे झाली. समाजाला एकत्र करण्यासाठी सुरू झालेल्या उत्सवाचे स्वरूप कालौघात बदलले. चकचकाट, जाहिरातींचा मारा, भव्यता, बदललेली आर्थिक आणि राजकीय गणिते या सगळ्यात गणेशोत्सवाची एकेकाळची ओळख असलेल्या अनेक गोष्टी आता स्मृतींमध्येही राहिलेल्या नाहीत. उत्सवातील बदलांचा आढावा घेणारी वृत्तमालिका..

समाजाला एकत्र करण्यासाठी सुरू झालेल्या गणेशोत्सवाने कलाकारांचे व्यासपीठ म्हणून ओळख मिळवली. ज्येष्ठ कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद रसिकांना देण्यापासून ते नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे काम गणेशोत्सवाने केले. मात्र सार्वजनिक उत्सवाची ही सांस्कृतिक ओळख हरवली असून अपवादात्मक मंडळे वगळता आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. एखाद्या ज्येष्ठ गायकाच्या सुरावटीऐवजी बहुतेक मंडळांमध्ये डीजेचा दणदणाट घुमत आहे. सोसायटय़ांमध्ये मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळख ही ज्येष्ठ नेत्यांची व्याख्याने, सामाजिक जागृती करणारे मेळे, मोठय़ा गायकांच्या मैफली, मंडळातील कलाकारांनी सादर केलेली नाटके अशा सांस्कृतिक समृद्धतेची होती. आता मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सजावट, आरास याकडे अधिक लक्ष देऊन सार्वजनिक मंडळे भाविकांना आकर्षित करण्याचा आटापिटा करताना दिसतात.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

तेव्हा काय?

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रामुख्याने नेत्यांची व्याख्याने, भाषणे हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. त्याचबरोबर सामाजिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी ‘मेळे’ हा प्रकार सुरू झाला. संगीत, नाटय़, नृत्य, लोककला यांच्या मिलाफातून एखाद्या विषयाची मांडणी करणे, लोकजागृती करणे हा मेळ्यांचा उद्देश होता. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात लोककलांचाही उत्सवामध्ये समावेश करण्यात येत होता. स्वातंत्र्यानंतर १९५८ मध्ये मेळे हा प्रकार बंद झाला. कीर्तन हा देखील उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रमुख भाग होता. शहरातील अनेक सरदारांच्या वाडय़ांमध्ये संगीत मैफली होत असत. वाडय़ांमधून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवांमध्ये संगीत मैफली होत असत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, सरस्वतीबाई राणे, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, सनईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेब अशा अनेक नामवंत गायक आणि वादकांनी पुण्यातील गणेशोत्सवाच्या काळातील मैफली गाजवल्या आहेत.

साधारण सत्तरच्या दशकात सिनेमाचे आकर्षण वाढले. त्यावेळी मंडळे उत्सवाच्या काळात मोठय़ा पडद्यावर सिनेमा दाखवत असत. साधारण त्याच दरम्यान सिनेसंगीताची मजा देणारा ‘ऑर्केस्ट्रा’ हा प्रकार सुरू झाला. काही ऑर्केस्ट्रा आणि गणेशोत्सव हे समीकरणच तयार झाले. ऑर्केस्ट्रामधून गाणारे अनेक कलाकार या गणेशोत्सवातूनच पुढे आले. चंद्रशेखर गाडगीळ यांचा ऑर्केस्ट्रा, सायन्ना, इक्बाल दरबार यांचा मेलेडी मेकर्स या आणि अशा अनेक कार्यक्रमांनी गणेशोत्सव गाजवला. ऑर्केस्ट्रामधून चालणाऱ्या नकला, निवेदन हे देखील आकर्षण होते. त्यानंतर एकपात्री कलाकारांचे कार्यक्रम, जादूचे प्रयोग असेही अनेक प्रवाह आले.

आता काय?

नव्वदच्या दशकानंतर हळूहळू सार्वजनिक मंडळांमधून सांस्कृतिक कार्यक्रम हद्दपार झाले. आरास, देखावे यांवर मंडळांनी अधिक भर दिला. गल्लोगल्ली दोन ते तीन मंडळे, जागेचा अभाव यांमुळे आता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळांकडून केले जात नाही. अपवादात्मक जुनी, मोठी एक-दोन मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. रोषणाई आणि मंडळांपुढे उभ्या असलेल्या ध्वनिक्षेपकांच्या िभती असे चित्र सार्वजनिक उत्सवाचे झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक मंडळांमध्ये एक-दोन मिनिटांच्या चित्रफिती, एखाद्या विषयावरील स्लाईड शो, काही मिनिटांमध्ये एखाद्या विषयाची मांडणी करणारे जिवंत देखावे एवढय़ा पुरताच सांस्कृतिक धागा टिकून आहे. मात्र सार्वजनिक मंडळांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली असली तरी रहिवासी सोसायटय़ांमध्ये ही सार्वजनिक ओळख अद्याप टिकून आहे. संगीत मैफली, व्याख्याने होत नसली तरी टीव्ही, मालिका यांच्या प्रभावातून रिअ‍ॅलिटी शोच्या जवळ जाणाऱ्या स्पर्धा, कलाकारांच्या मुलाखती असे कार्यक्रम सोसायटय़ांमध्ये होत आहेत.

काळानुरूप गणेशोत्सव बदलत गेला म्हणून तो टिकून आहे. पूर्वी खूप सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आता सार्वजनिक मंडळांमध्ये असे कार्यक्रम होत नाहीत हे खरे आहे. पूर्वी गणेशोत्सवाने अनेक कलाकार मोठे केले. सोसायटय़ांमध्ये अजूनही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

आनंद सराफ, गणेशोत्सवाचे अभ्यासक