राज्यभरात उत्साह आणि मंगलमय वातावरण

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून साधेपणाने साजरा होत असलेल्या गणेशोत्सवामध्ये उत्साह आणि पावित्र्याचा संचार शनिवारी पाहावयास मिळाला. विधिवत पूजेने राज्यभरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी प्रतिष्ठापनेची लगबग सुरू होती, तर सार्वजनिक मंडळांनी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे स्वागत केले.

विघ्नहर्त्यां गणरायाच्या उत्सवावर यंदा करोनाचे विघ्न असले तरी नेहमीच्याच उत्साहामध्ये राज्यभरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शासनाच्या नियमावलीचे पालन करीत साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर राज्यभरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी भर दिला. करोनामुळे नीरस आणि साचेबद्ध झालेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गणरायाच्या आगमनाने उल्हासाचे रंग भरले गेले. सुरक्षित अंतराचे भान ठेवत कार्यकर्त्यांनी मुखपट्टी परिधान करून उत्सवामध्ये सहभाग घेतला.

पुण्यामध्ये मानाच्या गणपती मंडळांच्या गणरायाची प्रतिष्ठापना मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. प्रतिष्ठापनेपूर्वी मिरवणूक काढण्यास मनाई असल्याने श्री कसबा गणपती आणि श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या पालखीतून निघालेल्या गणरायाचे दर्शन घेण्याची भाविकांची संधी हुकली. ढोल-ताशांचा गजर आणि बँडपथकांतील कलाकारांच्या सुमधुर सुरावटी या वैशिष्टय़ांविना गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यामुळे मध्य भागातील नागरिकांना साधेपणाचा गणेशोत्सव भावला. तर, करोना संकटाने उत्सवातील तरुणाईच्या वादन आविष्काराच्या आनंदाला मुकल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कोल्हापूरमध्ये मिरवणुका टाळून सार्वजनिक मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना साधेपणाने करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर नसला तरी मोरयाचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गणरायाचे आगमन झाले. सांगलीमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत नागरिकांच्या उत्साहामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सांगली संस्थानच्या गणेशाची गणेश दुर्ग येथील दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना झाली. साताऱ्यामध्ये गणरायाचा जयघोष, रांगोळीच्या पायघडय़ा आणि माफक सजावट अशा मंगलमय वातावरणात सार्वजनिक आणि घरगुती गणरायाचे आगमन झाले.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे नियमांचे पालन करत सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. घरगुती गणेशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोलापूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना केली. नगरमध्ये मंडळांनी साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना केली.

पुण्यात मिरवणूक नाही..

यंदा साधेपणाच्या गणेशोत्सवामध्ये पुण्यात कार्यकर्त्यांनी एकोपा आणि मांगल्याचे दर्शन शनिवारी घडविले. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका नसल्याने शहराच्या मध्य भागामध्ये वाहतूक कोंडी टळली. सुरक्षित अंतराचे भान ठेवून मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील सर्वच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच मानाच्या गणपती मंडळांची प्रतिष्ठापना अन्य मानाच्या मंडळ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाली.