गणरायाचे घरोघरी गुरुवारी आगमन होत असून, यानिमित्त पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या विविध मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्याआधी भव्य मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले आहे.
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा इंदूर येथील बाबा महाराज पराणेकर यांच्या हस्ते सकाळी ११.३६ वाजता केली जाणार आहे. त्याआधी सकाळी साडेआठ वाजता उत्सव मंडपापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा अॅड. अनिल हिरवे आणि नीलिमा हिरवे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. त्याआधी सकाळी १० वाजता मंडईतील टिळक पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दगडूशेठ मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा वाशिम येथील विजयकाका पोफळी महाराज यांच्या हस्ते १०.३१ वाजता केली जाणार आहे. त्याआधी सकाळी ८ वाजता मंदिरापासून ते उत्सव मंडपापर्यंत मिरवणूक निघणार आहे.
मंडई मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते ११.३० वाजता होणार आहे. त्याआधी सकाळी ९ वाजल्यापासून मंडईतील शारदा-गजाननाच्या मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हुतात्मा बाबू गेनू मंडळाची प्राणप्रतिष्ठा प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्याआधी ९ वाजता मंडपापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

प्राणप्रतिष्ठापनेसंबंधीची मते

गणेशचतुर्थीच्या दिवशी, गुरुवारी सूर्योदयापासून ते सकाळी सव्वानऊ पर्यंत उत्तम मुहूर्तावर श्रीगणेशपूजा व प्राणप्रतिष्ठापना करावी. घरोघरी मंगलमूर्तीची प्रतिष्ठा-पूजा सकाळी सव्वानऊपर्यंत करणे उत्तम आहे.
– पं. वसंत गाडगीळ

श्री गणेशचतुर्थीच्या म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत विधिवत पूजन करून घरोघरी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करता येईल. श्री गणेश पूजनासाठी वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही. पहाटे साडेचार ते दुपारी दीड या वेळेत श्री गणेशपूजन करावे.
– पंचागकर्ते मोहन दाते