आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यंदा शहरासह जिल्ह्य़ात गणेशोत्सवात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे. ७, ८, ९, १०, ११ आणि १२ सप्टेंबर हे सहा दिवस गणेश मंडळांना रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक यंत्रणा वापरता येईल. दरवर्षी पाच दिवस रात्री बारापर्यंत दिल्या जाणाऱ्या परवानगीच्या दिवसात यंदा एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गणेशोत्सवात सादर केल्या जाणाऱ्या देखाव्यांना आवाजासह दिली जाणारी परवानगी, विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिवर्धक यंत्रणा यांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की दरवर्षी रात्री बारापर्यंत चार दिवस आवाजासह देखाव्यांना परवानगी देण्यात येते. मात्र, कार्यालयीन कामे उरकल्यानंतर पुणेकर रात्री उशिरा देखावे पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे गणेश मंडळांनी सांगितले. त्यामुळे यंदा एक दिवसाने वाढ करण्यात आली असून एकूण सहा दिवस गणेश मंडळांना रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक लावता येतील.

गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणेच्या परवानगीबाबत राज्य सरकारसह प्रशासनाला काही अडचण नाही. मात्र, ध्वनिवर्धक यंत्रणेच्या आवाजाच्या तीव्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक यंत्रणा बंदच राहणार असून, त्यामध्ये कोणताही बदल यंदाही होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

‘तो प्रशासनाचा विषय’

यंदा गणेशोत्सवात पाचऐवजी सहा दिवस रात्री बारापर्यंत आवाजासह देखावे सादर करायला परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वर्षांतील १५ दिवस शहरासह जिल्ह्य़ात रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक यंत्रणांना परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यंदा गणेशोत्सवात सहा दिवस परवानगी दिल्याने उर्वरित वर्षांतील कोणत्या दिवसांच्या परवानग्या काढून घेण्यात आल्या आहेत, याबाबत पालकमंत्री पाटील यांनी मौन बाळगले. हा प्रशासनाचा विषय असून पुणेकरांच्या मागणीनुसार नियमाच्या अधीन राहून रात्री बारापर्यंत आगामी काळातही ध्वनिवर्धक यंत्रणांना परवानगी देऊ. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील अधिकच्या दोन दिवसांच्या परवानग्या यंदा गणेशोत्सवात दिल्या आहेत, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.