जलप्रदूषण टाळण्याच्या उद्देशातून गणपतींचे विसर्जन करण्याऐवजी गणेशाची मूर्ती दान करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. यंदाही असेच आवाहन करण्यात आले आहे. पण, यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील उपलब्ध असलेला अत्यल्प पाणीसाठा आणि शहरामध्ये सुरू असलेली पाणीकपात अशी दुहेरी किनार आहे.
दुष्काळाच्या या दिवसांमध्ये पाणीटंचाई असताना गणेशमूर्ती नदीमध्ये किंवा हौदामध्ये साठविलेल्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याऐवजी मूर्तिदान करून पुण्य मिळवावे या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे हे आवाहन करण्यात आले आहे. उत्तरपूजा केल्यानंतर देवत्व संपलेली मूर्ती दान करून आपण पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच एका चांगल्या संस्थेस मदत केल्याचे समाधान मिळवू शकतो. या मूर्तीच्या विक्रीतून येणारी रक्कम मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे. या अभिनव संकल्पनेस पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जलप्रदूषण टाळण्यामध्ये सहभाग घ्यावा. दीड दिवसांच्या गणपतींचे विजर्सन (१८ सप्टेंबर), गौरी विसर्जन (२१ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (२७ सप्टेंबर) असे तीन दिवस कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रम, नवी पेठ येथील एस. एम. जोशी पूल आणि नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिर अशा तीन ठिकाणी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळात गणेशमूर्ती दान उपक्रम राबविण्यात येणार आहे.