ढोलांचा दणदणाट, ताशांचा कडकडाट, रांगोळ्यांचे नयनमनोहर गालिचे, फुलांचे प्रेक्षणीय रथ, ’मोरया मोरया‘चा गजर आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले हजारो भाविक.. अशा वातावरणात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या पारंपरिक आणि शाही थाटातील मिरवणुकीला रविवारी प्रारंभ झाला. मानाच्या मंडळांनी मूत५चे विसर्जन महापालिकेने व्यवस्था केलेल्या हौदांमध्ये करून यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात नवा पायंडा पाडला.
पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणारी गणेशविसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते श्री कसबा गणपतीच्या ’श्रीं‘ची आरती मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ करण्यात आली आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीचा प्रारंभ झाला. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाडा हा मानाच्या पाच गणपतींचा क्रम असून त्यानुसार ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकाकडे सरकत होती. मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो पुणेकरांनी लक्ष्मी रस्त्यावर गर्दी केली होती. रांगोळ्यांच्या पायघडय़ा आणि चौकाचौकात रंगावलीचे नयनमनोहर गालिचे, बँडवर वाजणार्या भक्तिगीतांच्या सुरावटी, सनई-चौघडा वादन, ढोल-ताशा पथकांमधील तरुणाईचा उत्साह असा या मिरवणुकीचा दिमाख होता.
यंदाचा दुष्काळ आणि पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने केलेल्या हौदांमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय मानाच्या पाचही मंडळांनी तसेच श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्स्टने घेतला असून त्यानुसार दुपारी सव्वाचारच्या सुमारास श्री कसबा गणपती मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.
महापालिकेने नदीकाठी हौदांची व्यवस्था केली असून या उपक्रमाला यंदा मानाच्या मंडळांनी साथ देत पुण्याच्या गणेशोत्सवात नवा पायंडा पाडला.
मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढण्यात आली. तसेच श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूकही चांदीच्या पालखीतून काढण्यात आली.
श्री गुरुजी तालीम मंडळाने मिरवणुकीसाठी तयार केलेला फुलांचा भव्य रथ लक्षवेधील ठरला. श्री तुळशीबाग मंडळाचाही रथ प्रेक्षणीय झाला होता, तर श्री केसरी मराठा ट्रस्टच्या मिरवणुकीत प्रसंगनाटय़ सादर करण्यात येत होती. मिरवणुकीत सामाजिक संदेश देण्यावरही मंडळांनी यंदा भर दिला असून तसे देखावे मिरवणुकीत सादर करण्यात येत होते.